>> आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन दिवस सुट्टी; शिक्षण खात्याचा निर्णय; अंगणवाड्याही बंद; अन्य इयत्तांचे वर्ग सुरू राहणार
येथील हवामान विभागाने शुक्रवार दि. ८ जुलै रोजी राज्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करून काल रेड अलर्ट जारी केला. तसेच ९ व १० जुलै या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना ८ व ९ जुलै अशी दोन दिवस शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. नववी ते बारावीवीपर्यंतचे वर्ग मात्र नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच राज्यातील अंगणवाड्यांनाही दोन दिवस सुट्टी दिली जाणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणेंनी स्पष्ट केले आहे.
राज्यात गेल्या ४ व ५ जुलै रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे राज्यभरात अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. केपे, धारबांदोडा, सत्तरी, डिचोली, उसगाव आदी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच, जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. केपे येथे कुशावतीला नदीलाही पूर आला होता.
गेले दोन दिवस दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. आता, पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून रेड अलर्ट जारी केल्याने सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सक्रिय करण्यात आली आहे.
अतिवृष्टीची शक्यता असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास मुले कोठेही अडकून पडू नयेत, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण खात्याने हे पाऊल उचलले आहे.
राज्यात चोवीस तासात १.६८ इंच पावसाची नोंद झाली असून, वाळपई येथे सर्वाधिक ३.३९ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात येत्या ११ जुलैपर्यंत काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत ५२.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्जतेचे आदेश
राज्यात जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टमुळे जिल्हाधिकार्यांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. पोलीस, अग्निशामक, वीज, पीडब्लूडी, जलस्रोत खात्यासह इस्पितळ, रुग्णवाहिका, निवास केंद्र, अन्न व औषधे तयार ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करायचा असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला असून, धरणे काठोकाठ भरली आहेत. तसेच गोवा-महाराष्ट्र सीमेवरील तिळारी धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, उद्यापर्यंत धरणातील पाणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पाण्याचा तिळारी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या दोन्ही राज्यातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुलांच्या सुरक्षेसाठी सुट्टीचा निर्णय
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे, तर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरू राहणार आहेत. जोरदार पावसापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लहान मुलांना सुट्टी दिली जात आहे, असे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
अंगणवाड्यांनाही दोन दिवस सुट्टी
महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालकांना राज्यातील पावसाच्या रेड अलर्टमुळे अंगणवाड्यांना दोन दिवस सुट्टी देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.