>> मुख्यमंत्र्यांची माहिती; व्यस्त वेळापत्रकामुळे पंतप्रधानांच्या सोयीनुसार तारीख ठरणार
मोपा येथील ग्रीनफिल्ड विमानतळाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या दरम्यान कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच हा विमानतळ १ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
जीएमआर ह्या मोपा विमानतळ प्रकल्प विकासकाने काल पर्वरीत राज्यातील ९० युवकांना नोकर्यांसाठीची प्रस्तावपत्रे प्रदान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
प्रमाणपत्र प्रक्रिया आणि विमानतळावरून सुरक्षितपणे उड्डाण व लँडिंगसाठीची चाचणी घेणे हे काम लवकरच सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या व्यस्त कामातून मोपा विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी कधी गोव्यात येऊ शकतील, त्यानुसार तारीख ठरवनू विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील १५० युवकांचे बुधवारपासून उड्डाण कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण सुरू होत असून, त्यांचे हे तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही मोपा विमानतळावरील सेवेत सामावून घेतले जाणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय पुढील सहा महिन्यांत जीएमआर आणखी ५०० जणांना नोकर्या देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.