इंधन दरवाढीवरून कॉंग्रेसची भाजपवर टीका

0
19

पेट्रोल, डिझेल व एलपीजीच्या वाढत्या किमती व महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल कॉंग्रेसने बुधवारी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपने आपला काल ४२वा स्थापना दिन साजरा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यम समितीचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी करावी. तसे केल्यास भाजपची स्थापना ही लोकांना लुटण्यासाठी नव्हे, तर त्यांची सेवा करण्यासाठी झाली होती, हे सिद्ध होईल, असे पणजीकर म्हणाले.

गोव्यात पेट्रोलचे दर ६० रुपयांपर्यंत ठेवण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते; मात्र आता पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडला असल्याची टीका पणजीकर यांनी केली.
डिझेल व पेट्रोलचे दर दररोज वाढवले जात असल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्य जनतेवर होत आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून जनता हैराण झाली आहे. भाजप सरकार लोकांच्या हितासाठी आहे की त्यांना लुटण्यासाठी हे आता पक्षाने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.