>> चोवीस तासांत ३११९ नवे रुग्ण
>> सक्रिय रुग्णसंख्या १४,१३४
राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी नवीन ३११९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आणखी दोन कोरोना बळींची नोंद झाली आहे. इस्पितळांत दाखल होणार्या कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१.८४ टक्के एवढे आहे.
राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या १४ हजार १३४ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५३९ एवढी आहे.
राज्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. मागील तीन दिवसांपासून इस्पितळामध्ये दाखल होणार्या कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासात २८ जणांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहेत. मागील तीन दिवसात एकूण ७८ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळातून बरे झालेल्या ६ जणांना घरी पाठविण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन ९७९५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३११९ नमुने बाधित आढळून आले.
१००१ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १००१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०३ टक्के एवढे खाली आले आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट होत आहे.
राज्यात आत्तापर्यंत एकूण १ लाख ९७ हजार ०९६ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १ लाख ७९ हजार ४२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
९१३जणांना बुस्टर डोस
राज्यात १२ जानेवारीला ५८१९ जणांना कोविड लस देण्यात आली आहे. राज्यात आणखी ९१३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील ४९८ मुलांना कोविड लशीचा डोस देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ४८१ डॉक्टर पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पसरत असून महाराष्ट्रातील ४८१ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांनाही संसर्ग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असून मंगळवारी ३४,४२४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
ओमिक्रॉन, डेल्टावर कोव्हॅक्सिनचा
बुस्टर डोस प्रभावी ः भारत बायोटेक
भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस डेल्टा आणि ओमिक्रॉन वेरियंटवर अत्यंत प्रभावी असल्याचा दावा केला आहे. भारत बायोटेककडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या बुस्टर डोसमुळे निर्माण झालेल्या रोग प्रतिकारकशक्तीमुळे ओमिक्रॉन आणि डेल्टा या घातक प्रकारांवरही मात करता येऊ शकते, असा दावा भारत बायोटेकने केला आहे.
कोव्हॅक्सिन लशीचा बुस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचे नमुने घेण्यात आले. त्यावेळी ओमिक्रॉन आणि डेल्टावरही या बुस्टर डोसमुळे त्यांनी प्रभावीपणे मात केल्याचे आढळून आले. कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस ज्यांना देण्यात आला होता, त्यातील ९० टक्के जणांच्या नमुन्यांवरून हे स्पष्ट झाल्याचे भारत बायोटेकन म्हटले आहे.
गोमेकॉतील वीस डॉक्टर बाधित
बांबोळी येथील गोमेकॉतील २० निवासी डॉॅक्टर, तसेच अनेक परिचारिका कोरोनाबाधित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची एक बैठक घेण्यात आली असून त्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. इस्पितळामध्ये दाखल होणार्या कोविडबाधिताच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली.
देशपातळीवर चोवीस तासांत २ लाखाजवळ कोरोनाबाधित
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांची संख्या २ लाखांजवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना मृत्युंची संख्याही वाढलेली असून २४ तासांत ४४२ जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,८६८ इतकी झाली आहे. यातील अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.
डिस्चार्जबाबत धोरणात केंद्राकडून बदल
>> ताप नसल्यास तीन दिवसांनी डिस्चार्ज
कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल करताना केवळ तीन दिवसांतच रुग्णांना डिस्चार्ज मिळू शकणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी काल माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य विभागाने काल देशातील कोविड स्थितीबाबत माहिती देताना सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहिती दिली. कोविडची सध्या जी स्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात आता रुग्णांची सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा तीन प्रकारांत विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचेही धोरण बदलण्यात येत आहे. त्यानुसार कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असे मानले जाईल. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णालाही तीन दिवस ताप आला नाही आणि प्राणवायूची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल. या रुग्णाचीही पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालय व होम आयसोलेशन अशा दोन्हींसाठी हा नियम असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. गंभीर रुग्णाला सतत प्राणवायूची गरज भासत असेल. त्याची प्राणवायू पातळी अपेक्षित नसेल तर उपचारांमध्ये खंड पडू देऊ नये. यात सुधारणा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल, असेही नमूद करण्यात आले.
श्री. अगरवाल यांनी यावेळी कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या राज्यांतील आकडेवारी चिंताजनक आहे. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचे ते म्हणाले. भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ९ लाख ५५ हजारांच्या वर गेली आहे, असेही त्यांनी नमूद केले.