कोण आहेत भाजपात येणारे हे बडे नेते?

0
62

गुरुदास सावळ

जयेश साळगावकर, रवी नाईक आदींनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे बळ वाढले आहे. आणखी काही बडे नेते गोवा मुक्तिदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. हे बडे नेते कोण हे सांगायला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तयार नाहीत. ते नक्कीच बडे असतील. आता प्रतीक्षा करूया या बड्या नेत्यांची!

गोव्यात आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा करून आम आदमी पक्षाने गोव्यात खळबळ माजवली. ख्रिस्ती समाजाचा उपमुख्यमंत्री असेल असे त्यांनी जाहीर केल्याने ख्रिस्ती समाजही खूश झाला आहे. आम आदमी पार्टीने केलेल्या एका पाहणीत गोव्यातील ४० पैकी २४ मतदारसंघांत भंडारी समाजाचे मतदार बहुसंख्य असल्याचे आढळून आले आहे. सहा मतदारसंघांत ख्रिस्ती मतदार बहुसंख्य आहेत. त्यामुळे भंडारी आणि ख्रिस्ती मतदार एकत्र आल्यास ३० मतदारसंघ जिंकणे शक्य आहे असा अंदाज त्यांनी बांधला आहे. ३० पैकी किमान २१ मतदारसंघ जिंकले तरी ‘आप’चे सरकार येईल असे गणित त्यांनी मांडले आहे.

गोव्यातील आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा करायचा असल्यास त्याच प्रमाणात भंडारी समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी लागेल. आम आदमी पक्ष भंडारी समाजाच्या किती उमेदवारांना उमेदवारी देणार हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी भंडारी समाजाचा मुद्दा सध्या तरी भाजपने अत्यंत गंभीरपणे घेतल्याचे दिसते. भंडारी समाजाच्या नेत्यांना जवळ करण्याचे सत्र भाजपने सध्या आरंभले आहे. साळगाव मतदारसंघात केदार नाईक यांची उमेदवारी निश्चित झाली होती, तेथे आता भंडारी समाजाचे जयेश साळगावकर यांना पक्षात घेण्यात आले आहे. फोंडा येथे भाजपाचे खजिनदार संजीव देसाई यांना डावलून भंडारी समाजाचे नेते माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना भाजपमध्ये स्थान देण्यात आले आहे. गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक हे रवी नाईक यांचे अगदी अलीकडेपर्यंत अगदी निकटचे मानले जातात, त्यामुळे ‘जेथे रवी तेथे अशोक’ हे गणित अगदी उघड आहे. भंडारी समाजाचे अध्यक्ष भाजपात गेले आहेत किंवा काय हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी एखाद्या समाजाचे अध्यक्ष एखाद्या राजकीय पक्षात गेले म्हणून समाजाचे मतदार त्याच पक्षास मतदान करतील असे म्हणता येत नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे भाजपचे उपाध्यक्ष होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम भंडारी समाजाच्या मतदानावर झाला नव्हता. मांद्रे, शिवोली, शिरोडा, फोंडा आदी मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. साळगाव, वाळपई आदी मतदारसंघांत भंडारी समाजाचे भाजपा उमेदवार होते, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भंडारी समाजाचे अध्यक्ष भाजपात गेले किंवा इतर कुठल्या पक्षात गेले म्हणून मतदार आपले मत बदलतील असे वाटत नाही. मात्र भंडारी समाजाचे मतदार आपल्या समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देतात असे आजवरच्या अनुभवातून दिसून येते. शिरोडा मतदारसंघातून भंडारी समाजाच्या उमेदवाराला पाडून इतर समाजाच्या उमेदवाराला अनेक वेळा निवडून दिले गेले आहे. ज्या मतदारसंघात भंडारी समाजाचे प्राबल्य आहे, त्या मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्ष भंडारी समाजातील उमेदवारालाच उमेदवारी देत असतो, असा आजवरचा अनुभव आहे. भंडारी समाजाला उमेदवारी देण्याची घोषणा करणार्‍या आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार २४ मतदारसंघांत भंडारी समाज बहुसंख्य आहे. ज्या मतदारसंघात भंडारी समाजाचे मतदार बहुसंख्य आहेत, तेथे भंडारी उमेदवार द्यावा लागेल. आपपाशी भंडारी समाजाचे २४ उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांना आम आदमी पक्ष आपल्या पक्षात घेऊ इच्छितो. अनेकांनी तृणमूल कॉंग्रेसचा आसरा घेतला आहे.

पक्ष जास्त आणि उमेदवार कमी अशी परिस्थिती आज गोव्यात झाली आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या बर्‍याच नेत्यांनी भाजपाचा आसरा घेतल्याने इतर पक्षांची बरीच पंचाईत झाली आहे. विनोद पालयेकर विजय सरदेसाई यांच्याबरोबर राहून राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते, मात्र उद्या ते एखाद्या पक्षात गेले तर आश्चर्य वाटायला नको. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही भाजपात यावे म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबरला गोव्यात येत असून त्या दिवशी अनेक ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करण्याची बरीच शक्यता आहे. हे नेते कोण याबद्दल लोकांच्या मनात बरीच उत्सुकता आहे. ज्या पद्धतीने भाजपात बिगर भाजपवाल्यांची आयात चालू आहे, ते पाहिल्यास आगामी निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई दिल्लीला जाऊन कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांना भेटले. कॉंग्रेस आणि फॉरवर्डची युती झाल्याचे वृत्त त्यांनी दिले. ही भेट झाली तेव्हा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित होते. युती झाली अशी हवा निर्माण झालेली असतानाच ही युती नसून कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी विजय सरदेसाई राहुल गांधींना भेटल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले. कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी हे नेते राहुल गांधींना भेटले तर दिगंबर कामत तिथे का उपस्थित होते? गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेसची युती झाली तर त्याचा फायदा मडगावात दिगंबर कामत यांना व फातोर्ड्यात विजय सरदेसाई यांना होईल. त्यापलीकडे त्यातून काही साध्य होणार नाही.

गोवा फॉरवर्ड पार्टी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत सापडली आहे. या पक्षाला तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीन करा असा आग्रह तृणमूल कॉंग्रेसचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी धरल्याने बरोबरची बोलणी फिसकटली. कॉंग्रेसबरोबर युती न झाल्यास गोवा फॉरवर्डचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ नाइलाज म्हणून विजय सरदेसाई गिरीश चोडणकर भेटतील. यातून काही फार निष्पन्न होईल असे वाटत नाही.

मगो पक्षाला भाजपाबरोबर निवडणूक युती करायची होती. मात्र किमान १२ जागा देण्यास भाजप नेते तयार नसल्याने त्यांनी हा नाद सोडून दिला. मडकई व मांद्रे या दोन मतदारसंघांपुरताच मगोचा जोर आहे. प्रियोळ मतदारसंघावर मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आपला हक्क सांगत असले तरी अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता हे विसरून चालणार नाही. दीपक ढवळीकर व संदीप निगळ्ये या दोघांच्या भांडणात गोविंद गावडे परत बाजी मारू शकतात. फोंडा मतदारसंघात रवी नाईक आल्याने मगोचे बळ कमी झाले आहे. त्यामुळे मगो पक्ष फार तर चार पाच जागांवर बाजी मारू शकेल. वस्तुस्थिती ही अशी असताना भाजप मगोला १२ जागा का म्हणून देणार? त्यामुळे भाजपला डावलून मगोने तृणमूल कॉंग्रेस बरोबर युती केली आहे. तृणमूल कॉंग्रेसला सध्या ४० उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. मगो पक्षाने बारा मतदारसंघांत उमेदवार निवडले आहेत, तेथे तृणमूलचे कार्यकर्तेच नाहीत. त्यामुळे बाराही मतदारसंघ सोडण्यास तृणमूलने त्यांना कोणतीच अडचण आणली नाही. तृणमूल कॉंग्रेस आणि मगोची युती ही मगो – युगोची युती ठरणार आहे. मगो व युगोनेच युती केल्यासारखी ही परिस्थिती आहे. मगो बरोबर युती करून तृणमूल कॉंग्रेस उमेदवारांचा काहीच लाभ होणार नाही. या युतीचा मगो उमेदवारांनाही फारसा लाभ होणार नाही. मात्र युतीची घोषणा झाल्याने तृणमूल कॉंग्रेसचा फुकट प्रचार होऊ लागला आहे. कदाचित मगो नेत्यांचा आर्थिक लाभ होऊ शकेल.

आम आदमी पार्टीने गेली पाच वर्षे गोव्यात काम केले आहे. कोरोना काळात आपने गोव्यात भरपूर काम केले. त्या तुलनेत तृणमूल कॉंग्रेस पक्ष नवा आहे. त्यांची ‘गोंयची नवी सकाळ’ जाहिरात भरपूर गाजत आहे. गोव्यात कुठे गेल्यात ‘नवी सकाळ’ ची जाहिरात दिसते. मात्र त्यापलीकडे काहीच नाही. मगो बरोबर युती केल्याने मगो पक्ष तृणमूल कॉंग्रेसचा प्रचार करेल, मात्र पेडणे, मांद्रे, मडकई व प्रियोळ मतदारसंघामध्ये नव्या सकाळचा काहीच लाभ होणार नाही. नावेली मतदारसंघात तृणमूलचाही होणार नाही.
जयेश साळगावकर, रवी नाईक आदींनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे बळ वाढले आहे. आणखी काही बडे नेते गोवा मुक्तिदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. हे बडे नेते कोण हे सांगायला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तयार नाहीत. ते नक्कीच बडे असतील. आता प्रतीक्षा करूया या बड्या नेत्यांची!