देशभरातील जनतेसाठी गोवा ही कॅसिनोंची राजधानी बनली असल्याचे केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांचे गौरवोद्गार ऐकून आम्ही तर धन्य धन्य झालो. हेच ऐकण्यासाठी तमाम गोमंतकीय जनतेेचे कान आजवर आसुसले होते. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशीच इथल्या जनतेची आज भावना झालेली आहे. कान तृप्त झाले आहेत. आधी कॉंग्रेसच्या आणि नंतर भाजपच्या तमाम सरकारांनी तरंगत्या कॅसिनोंसाठी कधी उघडपणे, तर कधी आडून ज्या लाल पायघड्या अंथरल्या, ज्या ज्या क्लृप्त्या वापरून अभयदान दिले, त्याचे आता पुरेपूर सार्थक झाले! हे किशनजी केंद्रीय संस्कृती मंत्री आहेत. पाच हजार वर्षांच्या भारतीय संस्कृतीचा कोण अभिमान त्यांच्या ठायी भरला आहे पाहा. द्यूतामुळे महाभारत घडले. त्यामुळे द्यूत हा आपल्या महान परंपरेचा भाग आहे असा साक्षात्कार मंत्रिमहोदयांना घडला असेल तर त्यात नवल ते काय? त्यामुळे तरंगत्या पाण्यामध्ये द्यूतक्रीडेला गोव्यामध्ये असा बहर आलेला असताना मंत्रिमहोदयांना असे उचंबळून येणे स्वाभाविकच होते. गोव्यात बहरलेली ही द्यूतक्रीडा पाहून उद्या द्यूत हा राष्ट्रीय खेळ घोषित करण्याची हुक्की अन्य एखाद्या केंद्रीय मंत्र्याला आली तरी आश्चर्य वाटू नये. मांडवीच्या पात्रातले झगमगणारे कॅसिनो पाहून किशनजींचे डोळे किती दिपून गेले असतील त्याची कल्पना आपण करू शकतो. त्यामुळे उद्या गरज तर गोव्याला औपचारिकपणे कॅसिनोंची राजधानी घोषित करायचा मानसही आपल्या परमआदरणीय मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला आहे.
एकेकाळी हेच कॅसिनो येथे नकोत म्हणून त्यांच्या पक्षाची भगवी फौज पणजीच्या जेटीवर आंदोलनाचा देखावा करीत होती आणि सत्तेवर आल्यावर या कॅसिनोंना मांडवीत बुडविण्याचे वचनही आपल्या पक्षाच्या नेत्यांनी दिले होते हे मंत्रिमहोदयांना कसे बरे ज्ञात असेल? परंतु हे तारे तोडत असताना किशनजींच्या शेजारी बसलेले धर्मराज श्रीपाद नाईक यांनी तरी त्यांना हे दिव्य ज्ञान द्यायला काय हरकत होती? सत्तेवर येताच मनोहर पर्रीकरांनी कॅसिनोंना आत्ता हटवू, उद्या हटवू, परवाने रद्द करू असे सांगत सांगत वर्षानुवर्षे वेळ मारून नेत कसे हुशारीने कायमचे अभयदान दिले हे श्रीपादभाऊंना ठाऊक असेलच! दिल्लीत मंत्रिपद लाभल्याने त्याचे त्यांना सोईस्कर विस्मरण झाले असेल तर मागील विधानसभा सत्रांमधील प्रश्नोत्तरे एकदा त्यांनी डोळ्यांखालून घातली असती तर आपल्या नेत्यांनी गोव्याला ही कॅसिनोंची राजधानी बनवण्यासाठी किती किती खस्ता खाल्ल्या आहेत, त्यासाठी किती चाली खेळाव्या लागल्या आहेत, हे पाहून त्यांना भरूनच आले असते. पर्रीकर, पार्सेकर आणि प्रमोद सावंत या तिघांनीही ह्या कॅसिनोंना मांडवीत तरंगते ठेवण्यासाठी आजवर जी धडपड केली ती श्रीपादभाऊंनी आपल्या मंत्रिमंडळ सहकार्याच्या कानी घातली असती तर किशनजींच्या प्रेमाला अधिकच भरते आले नसते काय? विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तर सत्तेवर येताच उघडपणे कॅसिनोंना आपले समर्थन दिले. हे कॅसिनो इतकी वर्षे येथे आहेत आणि त्यामुळे सरकारला महसूल मिळतो अशी दोन कारणे त्यांनी त्यासाठी पुढे केली होती. त्यांचा हा पराक्रम केंद्रीय मंत्र्यांना कळला असता तर काय बिघडले असते?
सरकारला गोव्याच्या रस्तोरस्ती असलेल्या मद्य विक्री दुकानांतून आणि मद्यालयांमधूनही महसूल मिळतो, मसाज पार्लरच्या नावाने चालणार्या उच्चभ्रूंच्या कुंटणखान्यांतूनही महसूल मिळतो, अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी पर्यटक बनून गोव्यात येणार्या विदेशींमुळे तर आपली किनारपट्टीतील अर्थव्यवस्था चालते. त्यामुळे या सर्व गोष्टींनाही केंद्रीय संस्कृतीमंत्र्यांनी जाहीर समर्थन द्यायला आता काही हरकत नसावी. सोमरस, मादक पदार्थ आणि रतिक्रीडा हाही प्राचीन संस्कृतीचाच भाग आहे नाही का? अशा गोष्टींना कडाडून विरोध करणारे पामर आता राहिले आहेत कुठे? विरोधकांनाही आपल्याकडे कसे वळवून घ्यायचे याचे हुकुमी तंत्र तर आपण जाणताच आहात. गेल्या पाच वर्षांत त्याचा पुरेपूर प्रत्यय जनता घेत आलेली नाही का? तरंगत्या लखलखत्या कॅसिनोंमुळे आणि इतर गोष्टींमुळे गोव्याची ‘कीर्ती’ देशविदेशात पोहोचलेलीच आहे. आपण आता फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. आगामी मोपा विमानतळावर मनोरंजन नगरी उभारण्याचे कंत्राट एका कॅसिनो कंपनीला दिले गेलेच आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाचा आपल्या मानसाप्रमाणे ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड’ वर विकास करण्यासाठी गोव्याला देशाचे ‘कॅसिनो कॅपिटल’ घोषित करण्याच्या दिशेने फक्त एक पाऊल टाकायचे बाकी राहिले आहे. आपल्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची नाटके आता हवीत कशाला? किशनजी, करा की घोषणा!