सहकारी महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुण तेजपाल याच्या विरोधात येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची काल होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता २३ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या २३ डिसेंबर रोजी न्यायाधीश विजया पळ यांनी दिलेल्या आदेशाला तेजपाल यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या फेब्रुवारी २०१४ रोजी पासून या खटल्याची सुनावणी पणजी येथे वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर झाली. सध्या ही सुनावणी आरोपपत्र निश्चितीच्या स्तरावर आहे.२८ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोप निश्चितीपूर्वीच युक्तीवाद करण्याचा आदेश पणजी येथील न्यायालयाने दिला होता. परंतु आपल्याला आवश्यक कागदपत्रे व माहिती मिळाली नसल्याचे कारण पुढे करून युक्तिवाद करण्यास तेजपालच्या वकिलाने नकार दिला होता. यावर आवश्यक कागदपत्रे संशयित आरोपीला देण्याचा आदेश न्यायालयाने फिर्यादी पक्षाला दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर फिर्यादी पक्षाने सर्व कागदपत्रे व माहिती संशयित आरोपीच्या वकिलांना दिली होती. तरीही त्याचे समाधान झाले नव्हते.
येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया पळ यांनी गेल्या २३ रोजी फिर्यादी पक्षाने संशयित आरोपीला आवश्यक कागदपत्रे दिल्याचे ग्राह्य धरून आरोपपत्र निश्चितीपूर्वीचा युक्तीवाद करण्याचा आदेश दोन्ही पक्षांना दिला होता. त्यानुसार फिर्यादी पक्षाचे वकील ऍड्. सुरेश लोटलीकर व ऍड्. फ्रान्सिस ताव्होरा यांनी आपला युक्तीवाद केला नाही. न्यायाधीश विजया पळ यांनी २३ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशाला आरोपीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते व त्याची माहिती न्यायाधीशांना दिली होती. शुक्रवारी या खटल्यावर सुनावणी होणार होती. सुनावणी सुरू झाली असता आरोपीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान अर्जाचा मुद्दा उपस्थित केला. सोमवार दि. १२ रोजी आव्हान अर्जाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. त्यामुळे कालची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती आरोपीच्या वकिलांनी केली.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न्यायालयासमोर ठेवा असे आरोपीच्या वकिलांना सांगून न्यायाधीश विजया पळ यांनी पुढील सुनावणी येत्या २३ रोजी दुपारी २.३० वा. निश्चित केली. सुनावणीच्यावेळी न्यायालयात या प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होत्या.