राज्य सरकारने लिलाव केलेल्या 12 खाणीपैंकी 9 खाणी आता कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतात, तर उर्वरित 3 खाणी पुढील मार्च महिन्यात सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. त्यामुळे 2025 सालापर्यंत राज्यातील सर्व खाण अवलंबितांना रोजगार प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यातील खाण कामगार असोत, अथवा ट्रकमालक, अथवा खाणीशी संबंधित अन्य व्यावसायिक, सर्वांना 2026 साली रोजगार प्राप्त होणार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
पर्यावरणाचे नुकसान न करता या खाणी शाश्वत विकासाला चालना देण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 2012 सालापासून बंद पडलेला राज्यातील खाण व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसून, गोवा सरकारने ज्या खाणपट्ट्यांचा लिलाव केलेला आहे, त्या खाणपट्ट््यांतील खाणी कधी सुरू होतात याकडे अवलंबितांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
खाण व खनिज (विकास व नियमन) कायदा, तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानंसारच राज्यातील खाण व्यवसाय सुरू होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

