8 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
5

>> शिक्षकदिनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री – गुरू वशिष्ठ’ पुरस्कारांची अर्थात आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा 8 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (मंगळवार, दि. 5 सप्टेंबर) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या गटामध्ये चोनसाई-पार्से येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हर्षिता नाईक, मडगावातील ए. व्ही. लॉरेन्स सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनिया माणगावकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

माध्यमिक शिक्षकांच्या गटात सर्वण-डिचोली येथील केशव सेवा साधना संस्थेच्या विशेष मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या नारायण झांट्ये माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रेमानंद नाईक, दोनापावल येथील अवर लेडी ऑफ रोझरी माध्यमिक विद्यालयाच्या साहाय्यक शिक्षिका आंतोनेत डिसोझा, फातर्पा-केपे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या साहाय्यक शिक्षिका उमेशा सावळ यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुख्याध्यापकांच्या गटात पर्वरी येथील एल. डी. सामंत मेमोरियल माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. नीता साळुंखे, कोंब-मडगाव येथील पॉप्युलर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या गटातील पुरस्कार पीर्ण बार्देश येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे ग्रेड-1 शिक्षक दत्ता चंद्रकांत परब यांना जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, देशाचे एक आदर्श आणि जबाबदार नागरिक घडवण्यात शिक्षक मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे कार्य नेहमीच महत्त्वपूर्ण राहील. ‘मुख्यमंत्री – गुरू वशिष्ठ पुरस्कार 2022-23′ प्राप्त मानकऱ्यांचेही अभिनंदन करतो. जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आपले उदात्त कार्य चालू ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. दरम्यान, राज्यपालांनीही शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.