कर्नाटकातील तरुण पिढीमध्ये एचआयव्ही-एड्स संसर्गाचा प्रसार वेगाने वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000 हून अधिक विद्यार्थी आणि तरुण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्नाटक सरकारने आता राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी अभियांत्रिकी तसेच पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या शिफारशीनुसार, विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांमध्ये ‘एकात्मिक आरोग्य शिबिरे’ भरवण्याची तयारी सुरू केली आहे. कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या आकडेवारीनुसार, 18 ते 35 या वयोगटात एचआयव्हीचा संसर्ग चिंताजनक रीतीने वाढला आहे. 2023-24 मध्ये या वयोगटातील बाधित रुग्णांची संख्या 44,500 होती. 2025-26 मध्ये ही संख्या वाढून 66,600 वर पोहोचली. 18 ते 25 या महाविद्यालयीन वयोगटातील 7,000 हून अधिक तरुणांना एचआयव्हीचे निदान झाले आहे. यामुळेच सरकारने थेट महाविद्यालयांत जनजागृती आणि स्वेच्छेने चाचणी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

