गोव्यासह गुजरात, उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी पक्ष सज्ज
देशभरातील तरुणांशी साधणार संवाद
दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय संघाची भेट घेतली. तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी गोवा उत्तर प्रदेश, गुजरात आदी सात राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करत आढावा घेतला. या बैठकीत पक्षाचे नवे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, या भेटीची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांसोबतची बैठक चांगली झाली. अशा बैठका पक्ष मजबूत करण्यासाठी आणि लोकांशी जोडले जाण्यावर सखोल विचारमंथनासाठी एक व्यासपीठ असतात असे म्हटले.
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आणत या बैठकांवर जोर दिला आहे. भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्याचे पदाधिकारी, राज्य प्रभारी सहभागी झाले होते. या बैठकीत युवा मतदारांना आकर्षिक करण्यावर भर देण्यात आला. ज्या राज्यात पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्यावर अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे.
निवडणुकांसाठी भाजप सज्ज
2027 मध्ये होणाऱ्या सात राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी भाजप सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आणि रणनीती यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून विविध संघटनात्मक बाबींवर या बैठकांत चर्चा करण्यात आली. 2027 मध्ये गोव्यासह उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
यापैकी उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि गोवा येथे भाजपचीच सत्ता आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन व पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सर्व 67 नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नवीन संघाची घोषणा 17 ऑगस्ट रोजी झाली होती. 65 सदस्यीय संघात राम माधव यांना उपाध्यक्ष आणि स्मृती इराणी यांना महासचिव बनवून परत आणण्यात आले आहे.
जेन-झीशी जोडणार
भाजपने देशातील जेन-झी मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे व स्मृती इराणी यांच्यासह चार नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ‘जेन-झी’च्या आशा, चिंता, आकांक्षा समजून घेण्यावर या कार्यक्रमाचा भर असेल. केंद्र सरकारने युनिव्हर्सिटी आउटरीच कार्यक्रमाद्वारे महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट जोडले जाण्याची तयारी केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांचे प्रश्न, विचार आणि समस्या ऐकतील. बैठकीत मंत्र्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या पोहोचण्यावरही चर्चा झाली. यात विशेषतः तरुण लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
वंदे मातरमचा सन्मान
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‘वंदे मातरमचा सन्मान आणि तरुण मतदारांशी थेट संवाद साधणार आहे. भाजप देशभर ‘जेन-झी संपर्क अभियान’ राबविणार असून या अभियानासाठी नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. विनोद तावडे आणि स्मृती इराणी यांच्यासह गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समितीत समावेश आहे. तरुण पिढीसोबत थेट आणि नियमित संवाद साधणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

