622 कोटी रुपये गुंतवणुकीच्याउद्योगांना आयपीबीची मान्यता

0
10

उद्योगांतून 3180 जणांना रोजगार उपलब्ध होणार

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाच्या (आयपीबी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या बैठकीत सुमारे 622 कोटी रुपये गुंतवणुकीच्या विविध उद्योगांना मान्यता देण्यात आली. या उद्योगांतून 3180 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत उत्पादन, आतिथ्य, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, जहाजबांधणी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील विविध गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास मंडळाचे (जीआयडीसी) अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत मंजूर झालेल्या उद्योगांतून अंदाजे 622 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि सुमारे 3,180 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. शाश्वत आणि उच्च-मूल्याच्या गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत होईल. या प्रस्तावांमध्ये ऑटोमोटिव्ह घटक, ऑप्टिकल उपकरणांचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विकास केंद्रे, प्रगत फॅब्रिकेशन युनिट्स, आतिथ्य प्रकल्प, शैक्षणिक संस्था आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने उद्योग क्षेत्रातील हितधारक, संभाव्य गुंतवणूकदार आणि सरकारी अधिकाऱ्यांशी व्यापक सल्लामसलत करून तयार केलेल्या प्रस्तावित मोठ्या उद्योगांसाठी प्रोत्साहन योजनेवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच, पुढील मूल्यांकन व मंजुरीसाठी योजना पुढे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकार उद्योग-अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध असून, दर्जेदार गुंतवणूक आकर्षित करीत आहे. या धोरणामुळे रोजगार निर्मिती आणि स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने राज्याच्या प्रवासाला गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.