>> नोकरी मिळालेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची व्यथा
>> एप्रिलमध्ये मिळाली नोकरी; जूनमध्ये होणार निवृत्त
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या योजनेतून सरकारी नोकरी मिळालेल्या एका लाभार्थ्याला केवळ 3 महिने सरकारी खात्यांत काम करून निवृत्त व्हावे लागणार आहे. स्वातंत्र्यसैनिकाच्या त्या मुलाला वयाची 59 वर्षे आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर गेल्या डिसेंबर 2025 मध्ये नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. त्याची सरकारी खात्यात एप्रिल 2026 पासून नियुक्ती करण्यात आली. केवळ तीन महिने काम केल्यानंतर 30 जून 2026 मध्ये तो सेवानिवृत्त होणार आहे. त्याला अजून पहिल्या महिन्याचा पगार मिळालेला नाही. सरकारी पातळीवर पगाराची प्रक्रिया सुरू आहे. आता, सेवानिवृत्तीनंतर आपल्याला निवृत्ती वेतन द्यावे, अशी त्याची मागणी आहे.
आझाद मैदानावरील कार्यक्रमानंतर काल स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक मुलांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे काम केले. मात्र त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना केवळ क आणि ड गटातील नोकऱ्या दिल्या. अ आणि ब गटातील नोकऱ्या दिल्या नाहीत, असा आरोप डॉ. शिवाजी शेट यांनी केला.
डॉ. शिवाजी शेट यांनी अ गटातील नोकरीसाठी प्रयत्न केला होता. तथापि, त्यांना डावलण्यात आल्याची तक्रार आहे. अ आणि ब गटातील सरकारी पदांसाठी राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप डॉ. शिवाजी शेट यांनी केला.

