37 सक्रीय नक्षलवाद्यांचे दंतेवाडामध्ये आत्मसमर्पण

0
18

नक्षलवाद्यांत 12 महिलांचा समावेश

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या माओवादी नेत्यासोबत 37 सक्रीय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात बक्षिसे जाहीर झालेले 27 माओवादीदेखील सामील आहेत. यांच्यावर एकूण 65 लाख रुपयांचे इनाम घोषीत होते. जिल्ह्यात सुरू असलेली पुनर्वसन योजना ‘पूना मारगेम’मुळे या सर्वांनी शरणागती पत्करली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये 12 महिलांचाही समावेश आहे.
या सर्व माओवाद्यांनी 30 नोव्हेंबर 2025 रोजी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा संकल्प करीत पोलीस आणि प्रशासनासमोर शस्रास्रे खाली टाकल्याचे दंतेवाडा पोलिसांनी सांगितले.

या यशस्वी आत्मसमर्पण मोहिमेत डीआरजी, बस्तर फायटर्स, विशेष गुप्तचर शाखा, 111 वी आणि 230 वी सीआरपीएफ बटालियन आणि आरएफटी जगदलपूरच्या पथकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले. या एजन्सींनी महिन्यांहून अधिक काळ सातत्यपूर्ण दबाव, पाळत ठेवणे आणि विश्वासार्ह गुप्तचर माहिती आधारे या माओवाद्यांना आत्मसमर्पणासाठी तयार केले.

पुनर्वसन धोरणांतर्गत, सर्व आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना 50,000 रुपयांची तात्काळ मदत दिली जाणार आहे. याशिवाय छत्तीसगड सरकारच्या वतीने कौशल विकास प्रशिक्षण, कृषिभूमी आणि सामाजिक पुनर्वसनसारख्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या मोहिमेमुळे त्यांना नवीन जीवनाची संधी दिली जात आहे.

दंतेवाड्यात 20 महिन्यांत
165 जणांची शरणागती

केंद्र आणि राज्य सरकारच्या नक्षल पुनर्वसन नीतीचा परिणाम सतत दिसत आहे. गेल्या 20 महिन्यांत दंतेवाडा जिल्ह्यात बक्षिसे नावावर असलेल्या 165 माओवाद्यांसह 508 हून अधिक माओवाद्यांनी हिंसा सोडून समाजाच्या मुख्य धारेत प्रवेश केला आहे. माओवादी संघटनाच्या वरिष्ठ नेत्यांपासून खालच्या स्तरातील सक्रीय कॅडर मोठ्या संख्येने संघटनेपासून दूर गेले आहेत.