रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला 29 लाख 87 हजार 740 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित आरोपी मारफियर लोबो (रा. रायबंदर तिसवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शॉन स्टीफन मार्टिन्स यांनी पणजी पोलीस स्थानकात सोमवारी तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपीने आपणाला दुप्पट गुंतवणूक योजना देण्याच्या बहाण्याने सुमारे 29 लाख 87 हजार 740 रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर योजनेचे कोणतेही तपशील, कागदपत्रे देण्यास अपयशी ठरला. तसेच आपली रक्कम परत करण्यातही अयशस्वी झाला. हस्तांतरित केलेली रक्कम स्वतःच्या वापरासाठी वापरून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या फसवणूक प्रकरणात संशयित आरोपीला बीएनएसएसच्या 35 (3) अर्तंगत नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपेश डी. शेटकर तपास करीत आहे.

