>> भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केल्याची मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची माहिती
मगो पक्षाने प्रियोळ मतदारसंघावर दावा केलेला नाही. निवडणुकांना अजून विलंब आहे. 2027 ची विधानसभा निवडणूक युतीनेच लढवू, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण होईल आणि त्यानंतर जागांचे वाटप होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कुणीतरी दिशाभूल केल्यानेच युतीबाबत त्यांच्याकडून ते वक्तव्य करण्यात आले होते. माशेल येथे कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या हितासाठी भविष्यातही भाजप-मगो युतीचे सरकार कार्यरत राहणार आहे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
माशेलमधील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युती तुटण्याची शक्यता अनेक जणांनी केली होती. यानंतर सुदिन ढवळीकर यांनी भाजप-मगो पक्षाची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच झाल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांनी दिल्लीत दाखल होत युतीच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन चर्चा केली होती. संतोष यांनी भविष्यात सुद्धा भाजप- मगो युती गोव्यात राहणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मगोचे दोन्ही नेते माघारी गोव्यात परतले.
कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध प्रकारचे मेळावे तसेच संपर्क होणे आवश्यक असते. मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा संपर्कात राहणे नेत्यांना आवश्यक असते. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यास ते इतर पर्याय निवडू शकतात. कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सतत संपर्कात राहणे नेत्यांचे कर्तव्य असते; परंतु माशेल येथे मुख्यमंत्र्यांची कुणीतरी दिशाभूल केल्यानेच त्यांनी ते वक्तव्य केले असावे, असे दीपक ढवळीकर म्हणाले.
मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात चांगले काम करून पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मगो पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी अजूनपर्यंत कुणीच दबाव आणलेला नाही आणि भविष्यात कोणीही दबाव आणू शकणार नाही. विधानसभा निवडणुका दूर असल्या कारणाने सध्या तरी जागाद्दल चर्चा करणे अयोग्य आहे. निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण केल्यानंतरच जागांबद्दल चर्चा होईल, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
युतीविषयीचा भाजप श्रेष्ठींचा
संदेश मुख्यमंत्र्यांना पाठवला
>> मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडून स्पष्ट
भाजप-मगो युतीबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे काय म्हणणे आहे, त्यासंबंधीचा संदेश आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवला आहे, असे मगोचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी भाजप-मगो युतीबाबत केलेल्या काही विधानांच्या पार्श्वभूमीवर सुदिन ढवळीकर व मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेत त्यांच्याशी युतीबाबत चर्चा केली होती.
भाजप-मगोच्या युतीविषयीचा प्रश्न केंद्रीय नेते योग्य प्रकारे हाताळणार असल्याचे आपणाला आश्वासन मिळालेले असून, आपण ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कळवले असल्याचे काल ढवळीकर म्हणाले. भाजप व मगो यांच्यातील संबंध हे पूर्वीएवढेच दृढ आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

