2019 पासूनच्या नोकरभरतीवर श्वेतपत्रिका काढा

0
5

काँग्रेसची मागणी; घोटाळ्यात सामील आयएएस अधिकारी, अभियंत्याला निलंबित करा; न्यायालयीन आयोगाद्वारे चौकशीचाही आग्रह

सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन आयोगाद्वारे चौकशी केली जावी, तसेच या घोटाळ्यात पूजा नाईकने ज्या आयएएस अधिकारी आणि अभियंत्याचे नाव घेतले आहे, त्यांना ताबडतोब निलंबित केले जावे. याशिवाय गोवा सरकारने 2019 पासून केलेल्या नोकरभरती प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच हा घोटाळा जलद न्यायालयाकडे सुपूर्द करून लवकर निवाडा दिला जावा, अशी मागणी काल काँग्रेस पक्षाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
अखिल भारतीय काँग्रेस माध्यम समितीचे अध्यक्ष पवन खेडा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून वरील मागणी केली.

गोव्यातील नोकरी घोटाळ्याची व्याप्ती ही फार मोठी असून, काँग्रेस पक्ष याबाबत राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणार असल्याचे पवन खेडा यांनी याविषयी पुढे बोलताना स्पष्ट केले. त्याशिवाय काँग्रेस या प्रकरणी संसदेतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

बेरोजगार असलेल्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना नोकरी न देता फसवणे हे फार मोठे पाप असल्याचेही यावेळी खेडा म्हणाले. ज्यांचे पैसे बुडाले आहेत, त्यांना लवकर न्याय मिळण्याची आवश्यकता असून त्यासाठी हा घोटाळा जलद न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात यावा, अशी आपली मागणी असल्याचे खेडा यांनी यावेळी स्पष्ट केले.

नीती आयोगाने बेरोजगारीत गोवा अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट केलेले आहे. 2012 साली गोव्यात सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने 60 हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते याची आठवण पवन खेडा यांनी करून दिली. तसूच 2019 पासून झालेल्या सरकारी नोकर भरती प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी वरील घोटाळा हा तब्बल 500 ते 600 कोटी रुपयांचा असल्याचा व तो ‘व्यापमं’ घोटाळ्यासारखा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला.
एकट्या पूजा नाईकने आपण 17 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप केलेला आहे, असे सांगून अन्य 33 आरोपींनी दिलेली रक्कम केवढी असेल, याची कल्पना न केलेलीच बरी, असे पाटकर म्हणाले.

नोकरी घोटाळा : सखोल तपासाशिवाय कुठलेही वक्तव्य करणार नाही : मुख्यमंत्री

राज्यातील सरकारी नोकरभरती घोटाळ्यातील संशयित आरोपी पूजा नाईक हिने आत्ता केलेले वक्तव्य आणि आरोप यापूर्वी केले नव्हते. त्यामुळे या आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास करून पुरावे मिळाल्याशिवाय आपण किंवा पोलीस कुठलेही वक्तव्य करू शकत नाही. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल करून सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पूजा नाईक हिने नव्याने केलेले आरोप चर्चेचा विषय बनले आहेत. या प्रकरणात एक आयएएस अधिकारी, एक अभियंता यांच्याबरोबरच एक मंत्री गुंतल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनंतर गुन्हा अन्वेषण विभागाने पूजा नाईक हिला ताब्यात घेऊन जबानी नोंदवून घेतली. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.

सत्य जनतेसमोर येईल : ढवळीकर
पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांची गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जात असून, या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येईल, अशी प्रतिक्रिया वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.

‘त्यांनीही’ नोकरीसाठी पैसे दिले होते का? : ढवळीकर
पूजा नाईक हिने एका मंत्र्याला लक्ष्य करण्यासाठी काही माध्यमांना हाताशी धरल्याचा आरोप मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. ज्या पद्धतीने घटना घडत आहे ते पाहता मला वाटते की पूजाने काही चॅनल आणि काही वृत्तपत्रे विकत घेतली असतील. पूजाची मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीच्या भावालाही त्याच काळात साबांखामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनीही नोकरीसाठी पैसे दिले होते की गुणवत्तेनुसार निवड झाली होती, असा प्रश्न ढवळीकर यांनी केला.