2000 च्या नोटा चलनातून मागे

0
1

>> आरबीआयचा निर्णय

>> 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करण्यास मुदत

>> एका वेळी 10 नोटाच बदलता येणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी मोठा निर्णय घेत 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेत असल्याचे जाहीर केले. 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आपल्याकडच्या 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्यानंतर बदलून मिळणार आहेत. 20 हजार रुपये म्हणजेच एका वेळी 10 नोटा जमा करता येणार आहेत. आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. नित्य व्यवहारात त्यांचा वापर करता येणार आहे. आरबीआयने इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असे कारण देत 2 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी मोदींनी नोटबंदीचे 5 मोठे उद्देश सांगितले होते. त्यात काळ्या पैशाचा नायनाट करणे, संपूर्ण देशातील व्यवहार कॅशलेस करणे, बनावट नोटांची समस्या निकाली काढणे, काळ्या पैशांची निर्मिती थांबावी यासाठी मोठ्या किमतीच्या नोटा कमी करणे, अतिरेकी व नक्षलवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडणे असे हे 5 उद्देश होते. नोटबंदीनंतर 99 टक्क्यांहून जास्त नोटा पुन्हा आरबीआयकडे आल्याने हे उद्देश असफल ठरले. मोदी सरकारचा यातील एक उद्देश मोठ्या किमतीच्या नोटा कमी करणे असा होता; मात्र त्यानंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली होती. ही भारतीय चलनातील सर्वात मोठी नोट ठरली. त्यामुळे तो उद्देशही फोल ठरला.

नव्या नोटा देणे थांबवा; बँकांना आदेश
ग्राहकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तातडीने थांबवा, असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी 2000 रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाहीत; मात्र बँकांना 2000 हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना आरबीआयने केलेली आहे.

2018-19 ला छपाई थांबवली
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा बाजारात आल्या. 500 ची नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

2018-19 ला छपाई थांबवली
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा बाजारात आल्या. 500 ची नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

नोटा कधीपासून बदलता येणार?
आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये येत्या 23 मेपासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

एका वेळी किती नोटा बदलता येणार?
एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांच्या रकमेच्या नोटा बदलता येतील. त्यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

.म्हणून पंतप्रधान शिक्षित असावेत : केजरीवाल
या निर्णयावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांत प्रहार केला आहे. 2000 ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल, असे प्रथम सांगितले. आता ते म्हणत आहेत की 2000 ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो. पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो; मात्र त्यांना काहीच समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

1000 रुपयांची नोटही परत येईल : चिदंबरम
या निर्णयानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या काही आठवड्यांनंतर आरबीआयवर दबाव आणून 500 ची नोट परत आणण्यात आली. यापुढील काळात आरबीआयने 1000 रुपयांची नोटही परत आणली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा मूर्खपणाचा निर्णय लपवण्यासाठी 2,000 रुपयांची नोट चलनात आणली होती, असेही चिदंबरम म्हणाले.