होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांकडून 20 टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांत रद्द केला आहे. आखाती देश आता अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, इराणशी संबंधित जहाजे वगळता इतरांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात आली असल्याचेही त्यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी होर्मुझची सामुद्रधुनीत पुन्हा नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. शिवाय, होर्मुझची सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांकडून 20 टक्के शुल्क आकारणी करण्याची तयारीही बोलून दाखवली होती. मात्र काल त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. ट्रम्प यांनी होर्मुझवर नियंत्रणाची आणि 20 टक्के शुल्क आकारणीची घोषणा केल्यानंतर इराणने त्यांची खिल्ली उडवली होती.

