20 कामगारांच्या आस्थापनांसाठी नियमांचे पालन आता बंधनकारक

0
14

गोवा दुकाने व आस्थापना कायदा सरकारकडून अधिसूचित

राज्य सरकारने गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) कायदा, 2025 अधिसूचित केला आहे. राज्यातील दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, थिएटर आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामगार नियमांमध्ये मोठा बदल आणण्यात आला आहे. या कायद्यात 20 किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनांनी पूर्ण नियमांचे पालन केले पाहिजे, तर लहान आस्थापनांना फक्त कामकाजाची ऑनलाइन सूचना सादर करावी लागेल.

हा नवीन कायदा बालकामगारांवर बंदी घालतो. तसेच 18 वर्षांच्या कमी वयाच्या कामगारासाठी सात तास काम मर्यादित करतो. तसेच प्रौढांच्या कामाची मर्यादा दिवसाला 10 तास किंवा आठवड्यातून 48 तास इतकी निश्चित केली आहे. कामगारांना आठवड्याला सुट्टी, पाच तासांनंतर विश्रांती आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना नऊ दिवस आजारी रजा, सहा दिवस नैमित्तिक रजा, 15 दिवस अर्जित रजा (45 दिवसांपर्यंत संचित) आणि दरवर्षी नऊ पगारी सुट्ट्या मिळण्याचा हक्क आहे.

50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये पाळणाघर आणि 100 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये उपहारगृहाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. महिलांना त्यांच्या संमतीने जास्त वेळ काम करण्याची परवानगी देणे, त्यासाठी नियोक्त्यांनी सुरक्षितता, छळापासून संरक्षण आणि वाहतूक व्यवस्थेची सोय करायला हवी, असे या कायद्यात म्हटले आहे. हे विधेयक गोवा विधानसभेत 7 ऑगस्ट 2025 रोजी संमत केले होते. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी राज्यपालांनी त्याला मान्यता दिली.