गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने ‘डिजिटल अरेस्ट’ चा धाक दाखवून सुमारे 2.14 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणात एका व्यक्तीला नाशिक महाराष्ट्र येथे अटक करण्यात यश मिळविले आहे.
नाशिक, महाराष्ट्र येथील रोहन अरुण जाधव (25) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीने गेल्या 30 मे 2025 रोजी ट्राय आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हाट्सॲपद्वारे पीडिताशी संपर्क साधला. पीडिताला नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आणि पडताळणीच्या नावाखाली अनेक रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्यास भाग पाडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाने तांत्रिक देखरेख आणि आर्थिक विश्लेषणाद्वारे सखोल चौकशी केल्यानंतर संशयित नाशिक महाराष्ट्र येथील असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने नाशिक येथे धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळविले.
संशयित आरोपी निष्पाप पीडितांकडून जबरदस्तीने घेतलेले पैसे वळवण्यासाठी या सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाकडून तपास केला जात
आहे.

