>> आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या 146 खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार दि. 31 जानेवारीपासून सुरू होणार असून, ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील सभागृहाचे उपनेते राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीत काँग्रेस नेते कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेते टीआर बालू, शिवसेनेचे राहुल शेवाळे, समाजवादी पक्षाचे नेते एस. टी. हसन, जनता दल (युनायटेड) नेते एस. टी. रामनाथ ठाकूर आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) जयदेव गल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनात संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षांच्या 146 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार असून, बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना भाग घेता येणार आहे.
विरोधी पक्षांच्या 146 पैकी 132 खासदारांना केवळ हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे हे निलंबन पुढील अधिवेशनात म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपोआप संपुष्टात आले आहे. उर्वरित 14 खासदारांना विशेषाधिकार समित्यांनी त्यांचा निर्णय होईपर्यंत निलंबित केले होते. त्यापैकी 3 लोकसभेचे आणि 11 राज्यसभेचे होते. त्यांचे निलंबनही मागे घेतले जाणार आहे.