12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी

0
7

बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणामुळे खातेनिहाय चौकशीच्या घेऱ्यात सापडलेले म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांची पणजी येथील सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.
पोलीस खात्याने 12 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काल जारी केला. त्यात म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या नावाचा समावेश आहे. म्हार्दोळ पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांची गोवा पोलीस कल्याण सोसायटीमध्ये बदली करण्यात आली असून पर्वरीचे पोलीस निरीक्षक म्हणून राहुल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक म्हणून डायगो ग्रासीयस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक विकास देयेकर यांच्याकडे सायबर गुन्हा पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय दळवी यांची मडगाव वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या इतर पोलीस निरीक्षकांमध्ये हरिष गावस, नवीन देसाई, गौतम साळुंखे, देवेंद्र पिंगळे, संदीप केसरकर यांचा समावेश आहे.