७ ते ११ वयोगटातील मुलांच्या चाचणीला केंद्राची परवानगी

0
31

>> सीरमतर्फे लवकरच चाचणी सुरू होणार

भारतातील केंद्रीय औषध नियंत्रण विभागाने कोरोनाविरोधी लस उत्पादक कंपनी सीरमला वय वर्षे ७ ते ११ वयोगटातील मुलांनाही लसीकरण चाचणीत सहभागी करून घेण्यासाठी परवानगी दिली आहे. सध्या भारतातही लहान वयोगटातील मुलांनाही कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच ही लसीकरण चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय औषध नियंत्रण संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ज्ञांच्या समितीने नियमांप्रमाणे वय वर्षे ७ ते ११ वयोगटातील कोरोना विरोधी लसीकरणाच्या चाचणीत सहभागी करुन घेण्याची परवानगी दिली आहे. सीरमने याआधीच १२ ते १७ वयोगटातील मुलांच्या कोरोना विरोधी लसीकरण चाचणीला सुरुवात केलेली आहे. आता यात ७ ते ११ वयोगटाचाही समावेश झाल्याने या वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल. सीरमने १२ ते १७ वयोगटातील लसीकरण चाचणीच्या १०० सहभागींचा अहवाल केंद्राच्या औषध विभागाला सादर केला असून लवकरच यावर माहिती देण्यात येईल.
सध्या तरी भारतात केवळ झायडस कॅलिडिलाच्या डीएनएवर आधारीत कोरोना विरोधी लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांना देता येते.