६० गोमंतकीय खलाशी गोव्यात पोहोचले

0
194

विदेशातून मारेला बोटीतून आलेले ६० गोमंतकीय खलाशी मुंबईतून गोव्यात येण्यासाठी खास बसगाडीतून काल सकाळी रवाना झाले होते. ते रात्री उशिरा पत्रादेवी मार्गे गोव्यात पोहोचले. या सर्व ६० खलाशांना क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली.

राज्य मंत्रिमंडळाने विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या बोट मालक किंवा एजंटाकडून खलाशांचा क्वारंटाईन खर्च वसूल करण्याचा निर्णय  घेतला आहे. क्वारंटाईन खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत आलेले गोमंतकीय खलाशांना गोव्यात आणण्यास उशीर होत आहे. खलाशांना घेऊन येणार्‍या बोटीचे मालक किंवा एंजट क्वारंटाईन खर्च उचलण्यास तयार होत नाहीत, असा दावा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात आहे.

क्वारंटाईन खर्चाचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, विदेशातून येणार्‍या गोमंतकीय खलाशांचा क्वारंटाईन खर्चाचा विषय मुख्य चर्चेचा  मुद्दा बनलेला आहे. गोवा सीफेरर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर परतणार्‍या गोमंतकीय खलाशांकडून क्वारंटाईऩचा खर्च घेऊ नये, अशी मागणी केली  आहे. या असोसिएशनच्या पदाधिकार्‍यानी बंदर कप्तान सचिव पी. एस. रेड्डी,  नोडल अधिकारी ऍन्थोनी डिसोझा यांची भेट घेऊन क्वारंटाईन खर्चाच्या विषयावर चर्चा केली आहे.

कर्णिका या बोटीच्या व्यवस्थापनाकडून क्वारंटाईनबाबत निर्णय न घेतल्याने त्या जहाजावरील खलाशांना उतरवून तपासणी करण्यात आलेली नाही. क्वारंटाईऩ खर्चाचा प्रश्‍न उद्भवल्याने गोमंतकीय खलाशांना फटका बसण्याची शक्यता सीफेररच्या पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.