४५ वर्षांवरील व्यक्तींचे आजपासून लसीकरण

0
146

आज गुरूवार दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील फक्त गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाच लस दिली जात होती. पण आता सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.

देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्रे आणि खासगी इस्पितळातही ही लस उपलब्ध आहे. सरकारी केंद्रांवर ही लस मोफत दिली जात असून खासगी इस्पितळांत एका डोससाठी २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. ह्या लशीचे दोन डोस असून पहिला डोस खासगी इस्पितळात घेतला तर दुसरा डोसही खासगी इस्पितळातच शुल्क भरून घ्यावा लागतो.

दरम्यान, ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४५ वर्षांखालील नागरिकांनाही लस दिली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे.

दोन आठवड्यात लसीकरण
पूर्ण करण्याचे आवाहन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे, त्या जिल्ह्यांत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा
यांना कोरोनाची बाधा

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला विलगीकरणात राहून घेतले आहे.