३० लाखांचे दागिने चोरणार्‍यास शिताफिने अटक

0
145

मिरामार पणजी येथील गास्पर डायस सभागृहातील लग्नाच्या स्वागत सोहळ्याच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेले संशयित मुख्य आरोपीचे छायाचित्र, मध्य प्रदेश पोलिसांकडून संशयिताबाबत मिळालेली अचूक माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पकडण्यासाठी केलेल्या साहाय्यामुळे ३० लाखांचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या टोळीतील प्रमुख संशयित आरोपी सावन सिसोदिया (मध्यप्रदेश) याला गुजरात येथे पकडण्यात पणजी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

संशयित आरोपी सावन याने चोरीची कबुली दिली असून या प्रकरणातील अन्य संशयित आरोपी आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी मध्यप्रदेशमध्ये गेलेल्या पणजी पोलिसांच्या पथकाने संशयित सावन सिसोदिया याला गुजरात येथे ताब्यात घेऊन १ डिसेंबरला मध्यरात्री पणजीला परतले. त्यानंतर संशयित सावन याला रीतसर अटक करण्यात आली आहे. येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयित सावन याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या २६ नोव्हेंबर रोजी ३० लाखांच्या दागिने चोरीची घटना घडली होती. याबाबत गुरूनाथ पै यांनी पणजी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे.
या घटनेनंतर पणजी पोलिसांनी गास्पर डायस सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पाहणी केली. त्यावेळी एक मुलगा सभागृहातील सोन्याचे दागिने असलेली बॅग उचलून बाहेर नेत असल्याचे आढळून आले. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांची छायाचित्रे पोलिसांनी तपासून पाहिली. त्यातील संशयास्पद वाटणार्‍या एका व्यक्तीचे छायाचित्र विविध राज्यातील पोलिसांना पाठविण्यत आले. संशयित मध्यप्रदेश राज्यातील असल्याची पणजी पोलिसांनी माहिती मिळाली. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांकडून सदर संशयित व्यक्तीबाबत सविस्तर माहिती, मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. चोरीची घटना घडली त्यादिवशी संशयित सावन याचे मोबाईल लोकेशन मिरामार येथे असल्याचे आढळून आले. चोरीच्या प्रकारानंतर संशयित सावन व साथीदारांनी गोव्यातून पलायन केले. पणजी पोलिसांचे एक पथक या प्रकरणातील संशयिताच्या शोध घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे रवाना झाले होते.

पणजी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या साहाय्याने संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सावन याचे मोबाईल लोकेशन सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये मिळत होते. त्यानंतर मोबाईल लोकेशन गुजरातमध्ये मिळू लागले. संशयित सावन मुंबईच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस पथक तातडीने गुजरात येथे दाखल झाले. मोठ्या शिताफीने संशयित सावन याला ताब्यात घेण्यात यश मिळविले.
संशयित टोळक्याने नवी दिल्ली येथेही लग्न सोहळ्यात चोर्‍या केल्यची चर्चा सुरू आहे. या टोळक्याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.