३० मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कारवाई

0
7

>> अपघात टाळण्यासाठी पोलिसांची खास मोहीम सुरू; विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार

गोवा पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांविरोधात सुरू केलेल्या खास मोहिमेच्या पहिल्या दिवशी ३० वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा या महत्त्वाच्या शहरांसह अन्य ठिकाणी देखील पोलिसांनी कारवाई करत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना जोरदार दणका दिला.

राज्यात मद्यपान करून वाहन चालविणार्‍या वाहनचालकांविरोधात गोवा पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून खास मोहीम सुरू केली आहे. राज्यातील वाढत्या वाहन अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यभरात या मोहिमेच्या पहिल्या दिवशी मद्यधुंद अवस्थेतील ३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

उत्तर गोव्यात पणजी, म्हापसा या शहरांसह कळंगुट आणि हणजूण येथे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दक्षिण गोव्यात फोंडा, मडगाव, वास्को या शहरांसह कुडचडे, काणकोण, कोलवा, केपे येथे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनचालकांच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केली जात आहेत. त्या वाहनचालकांना न्यायालयाकडून दंड किंवा कारावासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. पोलीस पथकाकडून अल्कोमीटरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. मद्यपान केलेल्या वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने कारवाईसाठी वाहतूक खात्याच्या संबंधित कार्यालयांकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्तर गोव्याचे वाहतूक उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

सुधारित मोटर वाहन कायद्याखाली मद्यपान करून वाहन चालविणार्‍या वाहनचालकाला पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा ६ महिने कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. एकदा कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकाने पुन्हा मद्यपान केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर आणखीन कडक कारवाईची तरतूद आहे, असेही शिरवईकर यांनी सांगितले.

पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांबरोबर वेगाने वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सीट बेल्ट, हेल्मेट यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवरही कारवाई केली जात आहे, असेही शिरवईकर यांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाई केलेल्या मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले जाईल. नव्या मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली जाईल. पुन्हा याच गुन्ह्यात आढळून आल्यास अधिक शिक्षेची तरतूद आहे.

  • प्रबोध शिरवईकर,
    वाहतूक उपअधीक्षक, उत्तर गोवा.