अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी ओट्टा मोरा सालाझाई (६६) या कॉस्ता रिकाच्या एका नागरिकाला वागातोर येथील फुटबॉल मैदानाजवळ अटक करून त्याच्याकडून १ किलो चरस जप्त केले.
या चरसची किंमत २ लाख रु. एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर आरोपी वरील ठिकाणी एका ग्राहकाला चरस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयीन कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे. सदर आरोपी शापोरा येथे रहात असून यापूर्वी त्याला अशाच प्रकारे अमली पदार्थ विकण्यासाठी आला असता हणजुणे येथे अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. जामिनावर असताना पुन्हा अमली पदार्थ विकण्यास आला असता त्याला पोलिसांनी पुन्हा पकडले.