‘१०८’ रुग्णवाहिका कर्मचार्‍यांचे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणे

0
165

दुपारपर्यंत सेवेत घेण्याची मुदत
आज दुपारी १२ वाजेपर्यंत १०८ रुग्णवाहिका कर्मचार्‍यांना सेवेत न घेतल्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या निवासस्थानी धरणे धरण्याचा निर्णय वरील कर्मचार्‍यांच्या संघटनेने घेतला आहे, अशी माहिती राजन घाटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.आरोग्य खात्याला मधुमेह झाल्याचा आरोप घाटे यांनी केला. रुग्णवाहिका चालविणार्‍या जीव्हीकेने आंध्रप्रदेशमधील कर्मचार्‍यांना वरील सेवेत सामावून घेऊन गोमंतकियांवर अन्याय केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या १२ रुग्णवाहिका कार्यरत असून ३३ रुग्णवाहिका बंद आहेत. जीव्हीके भ्रष्टाचार करीत असल्याचे घाटे म्हणाले. धरणे आंदोलनातील वाळपई येथील रेश्मा गावकर हिची प्रकृती खालावली आहे. सरकारला गरीब महिलांचे काहीही पडून गेलेले नाही, असे घाटे म्हणाले.
दरम्यान, आझाद मैदानावर असलेले फिरते शौचालयही हलविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे साखळी उपोषणास बसलेल्या महिलांची तारांबळ उडाली आहे. साखळी उपोषण बंद करावे हा त्यामागील हेतू असल्याचे उपोषणास बसलेल्या महिलांनी सांगितले.