१०० वर्षांपेक्षा जुन्या वास्तू संरक्षित ठरवणार ः फळदेसाई

0
6

राज्यातील १०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या सर्व वास्तू ह्या संरक्षित वास्तू ठरवण्यात येणार असल्याची माहिती काल पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. त्याचबरोबर पोर्तुगीज राजवटीत ज्या धार्मिक वास्तूंची मोडतोड करण्यात आली होती. अशा वास्तूंची माहिती मिळवून त्या वास्तूंची फेरबांधणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासंबंधीचे पुरावे गोळा केल्यानंतरच हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, गोव्याशी संबंधीत जुने रेकॉर्ड्‌स व दस्ताऐवज आणण्यासाठी खात्याचे सरकारी अधिकारी पोर्तुगालला जाणार आहेत. मात्र, यापूर्वी आम्हाला हवे असलेले आमचे रेकॉर्ड्‌स व दस्ताऐवज नेमके कुठे आहेत ती माहिती मिळल्यानंतरच हे अधिकारी पोर्तुगालला जाणार आहेत. त्यासाठी इतिहास संशोधक व अन्य जणांची मदत घेतली जाणार आहे.राज्य सरकारने यापूर्वीच गोव्याचे जे रेकॉर्ड व दस्ताऐवज पोर्तुगालमध्ये आहेत ते गोव्यात आणले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, वेर्णे येथील मंदिराजवळ जे वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे त्यावर सुमारे ८ कोटी रू. खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.