॥ बायोस्कोप ॥ वीकेंड कल्चर

0
168
  • प्रा. रमेश सप्रे

आठवड्यात दोन दिवस विश्रांती मिळावी, बाहेर जायचं झालं तरी ती सांस्कृतिक कौटुंबिक सहल असावी- सहजीवनातून आयुष्य समृद्ध करणारी. दर सोमवारी नव्या उमेदीनं, उत्साहानं मंडळी कामाला रुजू व्हावीत ही मूळ कल्पना सुरुंग लावल्यासारखी उध्वस्त झाली. ही कसली कल्चर म्हणजे संस्कृती?

‘पाचवडा’ सुरू झाला अन् पश्चिमेची ‘वीकेंड कल्चर’ आपल्याकडे आली. आपला पूर्वीचा शब्द होता आठवडा. सात दिवसांच्या सप्ताहाला आठवडा का म्हणतात हे बरीच वर्षं लक्षातच येत नव्हतं. वाचनात आलं की पू. गोंदवलेकर महाराजांनी गोंदवल्याला आठवड्याचा बाजार सुरू केला. गुरुवारी. मंडळी जमू लागली. मंडळी म्हणू लागली, ‘आता भेटू या पुढच्या बाजाराला आठ दिवसांनी. पुढच्या आठवड्यात.’ मग लक्षात आलं की गुरुवार ते गुरुवार हे आठ दिवस होतात. म्हणून आठवड्याचा बाजार.

सातवडा म्हणजे सप्ताह तर कायदेशीर होताच. मग हा पाचवडा कोठून आला? त्याची गंमतच आहे. जे श्रीमंत देश आहेत, औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहेत तिथं सोमवार ते शुक्रवार असं पाच दिवस काम करायचं. शुक्रवारी आठवड्याचा पगार घ्यायचा नि निघायचं मौजमजा करायला शनिवार- रविवार म्हणजे वीकेंडला! खरं तर कौटुंबिक स्नेहमीलनासाठी दोन दिवस साप्ताहिक सुटी देण्याची कल्पना निघाली. तुटणार्‍या – फुटणार्‍या कुटुंबांना पुन्हा जोडण्यासाठी एक हृद्य योजना यातून निर्माण व्हावी अशी अपेक्षा होती.

पण झालं भलतंच. फक्त देहाच्या पातळीवरचे भोग- उपभोग यातच वीकेंड रंगू लागले. त्यांचे दुष्परिणाम देहामनावर म्हणजे एकूण आरोग्यावर दिसू लागले. काही आदर्श अपवाद सोडले तर या वीकेंड कल्चरचं घोषवाक्य बनलं ‘खा- प्या- मजा करा’. प्रत्यक्ष वर्तन बनलं, ‘खाऊ या – पिऊ या- नाचू या – गाऊ या – दूरवर जाऊ या- मजा करु या.’ यातही काही वाईट नव्हतं. पण जेव्हा अतिरेक झाला तेव्हा व्यसनाधीनता वाढू लागली. दारु- सिगारेट फार सामान्य व्यसनं बनली. त्यांच्यापुढे निरनिराळ्या पद्धतीन घ्यायची घन- द्रव- वायुरूपातली उत्तेजक नि उन्मादक द्रव्यं बनू लागली. जोडीला जुगारांचे अड्डे जमू लागले. सारं वातावरण कलुषित आणि प्रदूषित बनून जाऊ लागलं. एक प्रकारची नशा चढू लागली जी आठवडाभर टिकू लागली. ती अनेकांच्या बाबतीत जीवघेणी बनली. ही कसली विकेंड कल्चर?
अनेक ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिसेस- फॅक्टरी – कारखाने इतकंच नव्हे तर घरोघरी कार्यक्रम बनू लागले. येता वीकेंड कुठे- कसा- कुणी कुणी साजरा करायचा? लठ्ठ पगार आणि दिमतीला सर्व प्रकारची वाहनं नि साधनं – मग काय? लेट्‌स जीटीएच! हे वीकेंड अँथेम बनून गेलं. जीटीएच… म्हणजे गो टू हेवन…. पण प्रत्यक्षात अनुभव गो टू हेल! लेट्‌स गो टू हेल’. … या शब्दात एक जळजळीत दाहक वास्तव दडलं होतं.
असंख्य युवांची (यात युवकांच्या संख्येइतकीच युवतींची संख्या) परिस्थिती – देहस्थिती आणि मनस्थिती केविलवाणी करुण बनून गेली. त्यांचा प्रवास सुरू झाला ‘हँगओव्हरकडून हँगओव्हरकडे म्हणजेच नशेकडून नशेकडे!’
हे चित्र अतिशयोक्त किंवा एकांगी वाटेल. पण ही चित्रं पहा ना! बायस्कोप चित्रंच तर पहायची असतात.

  • चित्र १ ः दिवस शुक्रवार – पगाराचा दिवस. सारा वेळ मोबाईल – लॅपटॉप- कॉंप्युटरचे पडदे झगमगत असतात. आकडे- शब्द- चित्रं- नकाशे (रुट मॅप्स, साइट प्लॅन्स इ.) अशा रंगीबेरंगी आकारांनी!
    साहजिकच कामाकडे दुर्लक्ष. त्यात अपरिहार्यपणे होणार्‍या चुका. पण सर्व वीकेंडर्सच्या पेशीपेशीत एक भावी अनुभवांची नशा. परिणाम?
  • चित्र २ ः दिवस शनिवार – रविवार (शुक्रवारची रात्रसुद्धा)
    ‘हा हा.. ही ही.. हू हू.. हे हे.. हो हो.. हौ हौ’ अशा ‘ह’च्या बाराखडीत जल्लोष करत म्हणजे कोरस ओरडत वाहनातून प्रवास .. जोडीला नशेची सारी साधन सामग्री. मुक्काम असलाच तर तिथंही असाच गदारोळी हंगामा. दम मारो दम म्हणत डोळे, पाय सुजवणारी, आवाज बसवणारी लाऊड- व्हॉल्यूममधली गाणी, जोडीला हायव्होल्टेज उत्तेजक नाच.
  • चित्र ३ ः दिवस सोमवार. नाइलाजानं थकल्याभागल्या, मस्तीनं सुस्तावलेल्या नि दंग्यानं दमलेल्या- आंबलेल्या स्थितीत कामाच्या ठिकाणी. परिणाम एरवी दिसून येणारी कार्यक्षमता आणि उत्पादकता (एफिशन्सी अँड प्रॉडक्टिव्हिटी) जवळजवळ शून्य (निअर झिरो) पातळीवर आलेली.
    या सार्‍याचा नकारात्मक परिपाक म्हणून –
    अनेक दुकानांनी, सुपर मार्केट, मॉल्सनी दर्शनी भागात ठळक अक्षरात लावलेले फलक – * शुक्रवारी तयार झालेल्या (जोडलेल्या) गाड्या (असेंबल्ड कार्स) आम्ही विक्रीस ठेवत नाही.
  • सोमवारी तयार झालेल्या वस्तू (फिनिश्ड प्रॉडक्ट्‌स) आम्ही विकत नाही.
    काय चित्र आहे पहा! शुक्रवार – शनिवार – रविवार- सोमवार असे सातातले चार दिवस बिनकामाचे, निकामी? कसला हा वीकेंड?
    याच्या जोडीला गरीब, झोपडपट्टीत राहणारी व्यसनी, जुगारी मंडळी पूर्वी दोनच रात्री जुगार खेळायची. आता जोडीला शुक्रवारची रात्रही मिळाली.
    वीकेंड कल्चरचा मूळ उद्देशच उखडला गेला. आठवड्यात दोन दिवस विश्रांती मिळावी, बाहेर जायचं झालं तरी ती सांस्कृतिक कौटुंबिक सहल असावी- सहजीवनातून आयुष्य समृद्ध करणारी. दर सोमवारी नव्या उमेदीनं, उत्साहानं मंडळी कामाला रुजू व्हावीत ही मूळ कल्पना सुरुंग लावल्यासारखी उध्वस्त झाली. वीकेंड कल्चरनं मित्रमंडळी (पीअर् ग्रुप्स) कुटुंबातली मंडळी घडण्याऐवजी बिघडू लागली. ही कसली कल्चर म्हणजे संस्कृती? ‘वर्ककल्चरला (कार्यसंस्कृतीला)’ पूरक- पोषक अशी ‘वीकेंड कल्चर’ रुजवली पाहिजे. खरं ना?