॥ बायोस्कोप ॥इन् अँड आउट्

0
139
  • प्रा. रमेश सप्रे

कोविडनं- लॉकडाउननं जरी झाकण घातलं तरी मनात खदखदत असलेली ही साप्ताहिक आउटिंगची उर्मी जरा परिस्थिती निवळताच उफाळून वर येईल. आपण आपल्यापुरता तरी कोविडनं शिकवलेला हा धडा शिकू या. सतत आउटिंग- आउटगोइंग करण्यापेक्षा थोडं तरी इनिंग क़िंवा इनकमिंग करू या. ते खरं होमकमिंग असेल. स्वीट होमकमिंग!

‘इन् अँड आउट्’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही दृश्यं तरळू लागतात. एखादी मोठी इमारत कोणत्याही संस्थेची वा कार्यालयाची. दोन भव्य द्वारं. एकाशेजारी पाटीवर लिहिलेलं ‘इन्’ तर दुसर्‍या द्वाराच्या पाटीवर असतं ‘आउट’. अर्थ समजायला सोपा आहे. ‘इन्’ द्वारातून आत यायचं नि काम झालं की ‘आउट’मधून बाहेर.

आणखी एक नेहमीची जागा म्हणजे पेट्रोल पंप. तिथंही ‘इन्’ आणि ‘आउट’ असं लिहिलेलं असतं. बरेचसे लोक त्याप्रमाणे आपली वाहनं आत- बाहेर करतातही. पण काही स्वैर वृत्तीची माणसं (विशेषतः तरुणाई) सोयीच्या दारातून आतबाहेर करते. काय करायचं, दार म्हटलं की ये-जा आलीच. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी. अपघात झाला तर विशेष काय, अपघातच ना तो?
या संदर्भात दोन काहीसे मजेदार प्रसंग बायोस्कोपमध्ये पाहू या. एक पुस्तकातला, दुसरा जीवनातला…

  • पूर्वीच्या जमान्यातले विनोदी लेखक चि. वि. जोशी त्यांच्या प्रसंगातून विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. चित्रमयी शैलीत ते प्रसंग असा काही चितारायचे की तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहून वाचणार्‍याची हसून मुरकुंडी वळायची. त्यांचे नायक चिमणराव नि गुंड्याभाऊ दोघांनी एक सेकंडहँड गाडी (कार) विकत घेतली. तिचं वैशिष्ट्य हे की बंद असली तर चालू व्हायची नाही अन् चालू असली की बंद व्हायची नाही. आता गाडी घेतली तर ती रुबाबात ऑफिसमधल्या लोकांना दाखवायला नको का? म्हणून गेले घेऊन ऑफिसात. आपण शिस्तीचे भोक्ते याचंही इंप्रेशन सर्वांवर पडावं म्हणून ‘इन्’ दारातून आत गेले. पहिल्यांदा कुणाच्या विशेष लक्षात आलं नाही. पण गाडी बंद होईना म्हणून चिमणराव पुन्हा ‘आउट’मधून बाहेर गेले नि ‘इन्’मधून आत आले. तरीही गाडी बंद होण्याचं चिन्ह नाही. म्हणून पुन्हा ‘आउट’मधून बाहेर अन् ‘इन’मधून आत… हे दृश्य पाहिल्यावर हा गाडीतून चकरा कोण मारतोय म्हणून ऑफिसमधले सारे लोक बाहेर आले. त्यांच्यासमोरून जाताना हात बाहेर काढून त्यांना ‘हाऽय’ करत होते. पण चकरा चालूच राहिल्या. कुठपर्यंत? गाडीतलं पेट्रोल संपेपर्यंत. शेवटी एकदाची गाडी थांबली. घामाघूम झालेले चिमणराव मान खाली घालून उतरले. एरवी ऑफिसमध्ये चालून येतानाही इतका घाम येत नव्हता. सार्‍या मंडळींना कळेना की गाडी घेतल्याबद्दल चिमणरावांचं अभिनंदन करायचं की चिमणचं सांत्वन करायचं?
    ** आता हा दुसरा प्रसंग. तसा मार्मिक आहे. गुरुदेव रानडे हे अलाहाबाद विद्यापीठाचे उपकुलगुरु (व्हाइस चॅन्सेलर) होते. तेव्हा त्यांची सारी कामं करण्यासाठी एक घरगडी विद्यापीठानं त्यांना दिला होता. तो सारी कामं मन लावून करत असे. आपले मालक कुणीतरी खूप मोठी व्यक्ती आहे. अनेक महत्त्वाची माणसं त्यांच्याकडे येतात. त्यांना नमस्कार करतात. त्या काळी नावाची पाटी विशेषतः सतत कार्यमग्न असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावरची एका विशिष्ट प्रकारची असे. त्यावर तिथं राहणार्‍याचं नाव नि त्याच्याखाली ‘इन्’ आणि ‘आउट’ असे शब्द लिहिलेले असायचे. ती व्यक्ती घरात असेल तर एक सरकणारी पट्टी ‘इन्’ उघडं ठेवून ‘आउट’ झाकून ठेवायची सोय त्या नावाच्या पाटीवर असे. आपल्याला इंग्लिशमधलं निदान इन-आउट कळतं हे इतरांना कळावं म्हणून तो घरगडी गुरुदेव बाहेर गेले की ‘आउट’ करून ठेवत असे नि येताना दिसले की पटकन् ‘आउट्’चं ‘इन्’ करून ठेवत असे. गुरुदेवांच्या हे लक्षात यायचं नि घरात येताना ते पाटीवर पुन्हा ‘आउट्’ करून घरात प्रवेश करायचे. एकदा धाडस करून त्या घरगड्यानं गुरुदेवांना विचारलं की तुम्ही घरात असताना ‘आउट्’ म्हणून दाखवणं हे खोटं बोलणं नाही का झालं? यावर गुरुदेव हसून म्हणत ‘तुला कळणार नाही, पण संध्याकाळी घरात असलो तरी उपासना करताना मी आउटच असतो. नुसत्या घराच्याच नव्हे तर या जगाच्याही बाहेर असतो. (आउट् ऑफ् धिस् वर्ल्ड). तो बिचारा आ वासून बघत राहायचा. असो.
    वाणिज्य शाखेच्या (कॉमर्स ब्रांच) किंवा हल्ली व्यवस्थापनशास्त्राच्या (मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना दोन पद्धती शिकवल्या जातात या इन् अँड आउट् बद्दल. त्या तशा जीवनातही उपयोगी पडतात. एक ‘फिलो’ नि दुसरी ‘लिफो’. हे शब्द गमतीचे वाटतील. पण मूळ शब्द कळले की डोक्यात प्रकाश पडेल. फिलो म्हणजे ‘फर्स्ट इन्, लास्ट आउट्’ आणि ‘लिफो’ म्हणजे ‘लास्ट् इन्, फर्स्ट आउट्’. समजा एक गोडाऊन आहे. त्यात आलेली पार्सलं भरली जातात. ते गोडाऊन भरलं. त्यातून माल काढायची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी शेवटी टाकलेलं पार्सल सर्वांत आधी बाहेर निघेल आणि सर्वांत आधी टाकलेलं पार्सल सर्वांत शेवटी बाहेर येईल.

याचाच अर्थ- ‘फर्स्ट इन् लास्ट आउट्’ अन् ‘लास्ट इन् फर्स्ट आउट्’. म्हणूनच अगदी शेवटच्या क्षणी केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. म्हणून ‘हुशार’ (नियमित अभ्यास न करणारी) मुलं आदले दिवशी अभ्यास करून कशीबशी पास होतात.

यातून ‘इन् अँड आउट्’बद्दल एक निराळा विचार वरती येतो. ‘इनपुट् नि आउट्‌पुट’! जसं नि जितकं इनपुट् तसं नि तितकं आउटपुट्. चांगले विचार डोक्यात, स्मृतीत भरले की चांगलेच विचार बाहेर पडतात. संस्कारांच्या बाबतीतही असंच असतं. दुर्दैवानं हल्ली इनपुट्- आउटपुट् ही संकल्पना उद्योग क्षेत्रापुरती मर्यादित उरलीय.

आपल्या सध्याच्या जीवनशैलीला देहाच्या अधिकाधिक उपभोगांचं वळण लागलंय. यालाच चंगळवाद असंही म्हणतात. दर आठवड्याच्या वीकेंडला आउटिंगसाठी जायचं हे रुटीनच होऊन बसलंय. कोविडनं – लॉकडाउननं जरी झाकण घातलं तरी मनात खदखदत असलेली ही साप्ताहिक आउटिंगची (बाहेर जाण्याची) उर्मी जरा परिस्थिती निवळताच उफाळून वर येईल. आपण आपल्यापुरता तरी कोविडनं शिकवलेला हा धडा शिकू या. सतत आउटिंग – आउटगोइंग करण्यापेक्षा थोडं तरी इनिंग क़िंवा इनकमिंग करू या. ते खरं होमकमिंग असेल. स्वीट होमकमिंग! बघा