॥ आरोग्य मंथन ॥ विविध पैलू औषधाचे

0
158
–  प्रा. रमेश सप्रे
ज्यावेळी सर्व प्रकारची उपाय-उपचार योजना करूनही अपेक्षित गुण येत नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात- ‘अब दवासे नहीं दुवासे काम लेना चाहिये|’ तसं पाहिलं तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रयत्न आणि प्रार्थना या दोहोंचाही उपयोग होतो- पण आधी भरपूर प्रयत्न केल्यावर मग परमेश्‍वराकडे वळणं योग्य असतं नाही का?
औषध आवडीनं नि आठवणीनं घेणारी व्यक्ती दुर्मीळच. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत औषध ही गोष्ट कुणालाही आवडत नाही. प्रभावी औषध आणि हितकारक उपदेश लोकांना आवडत नाही. कारण या दोन्ही गोष्टी बर्‍याच वेळा कडू असतात. याची उत्तम उदाहरणं म्हणजे रामायणातला विभीषण नि महाभारतातला विदुर. ‘सीतेची सन्मानपूर्वक पाठवणी कर आणि आपलं राक्षसकुल नि लंका या दोन्हींचं रक्षण कर’ असं सांगणार्‍या बंधू बिभीषणाला रावणानं राज्यातून हद्दपार केलं. तसंच स्वतःच्या पुत्रांचं रक्षण करण्यासाठी पांडवांचं राज्य त्यांना सन्मानपूर्वक परत कर असं वारंवार सांगणार्‍या बंधू विदूरालाही धृतराष्ट्रानं हाकलून दिलं.
या दोघांचंही सांगणं परिणामाच्या दृष्टीनं हितकर असूनही कटू होतं. म्हणून त्याचा स्वीकार केला गेला नाही. रुग्णाच्या दृष्टीनं आरोग्य ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. हे माहीत असूनही ते कुणालाही मनापासून रुचत नाही.
* अनिष्टं अपि औषधं आतुराय ददाति वैद्यश्च यथा निगृह्य |
तद्वत् मयोक्तं प्रतिकूलं एतत् तुभ्यं हितोदर्कं अनुग्रहाय ॥
– म्हणजे ज्याप्रमाणे वैद्य रुग्णाला हितकारी परिणाम करणारे परंतु (कडू – असल्यामुळे) त्याला न आवडणारं औषध निश्चयानं नि जबरदस्तीनं देतो; त्याचप्रमाणे तुमचं कल्याण व्हावं म्हणून परिणामी हितकारक ठरणारं हे प्रतिकूल (तुम्हाला नावडणारं) वचन मी तुम्हाला बोललो आहे.
जीवनात असंच घडतं. ऐकायला बरं वाटणारं, खोटी स्तुती करणारे, भाषण करणारे मित्र आपल्याला प्रिय असतात. पण खर्‍या अर्थानं आपलं हित असलेलं भाषण करणारे खरे मित्र आपल्याला शत्रूसारखे वाटतात कारण त्यांचं सांगणं आपल्याला आवडत नाही. त्याचप्रमाणे अनेक दोष असलेल्या वस्तूही त्यांच्या काही औषधी गुणधर्मांमुळे आवश्यक बनतात.
पुराणात आपल्या आजुबाजूला दिसणार्‍या, अनुभवाला येणार्‍या गोष्टींबद्दल गंमतीदार उल्लेख असतात. उदाहरणार्थ- खारोटीच्या पाठीवरील पट्टे हे रामानं तिला प्रेमानं हातात घेऊन तिनं सेतुबंधनात केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या बोटांच्या स्पर्शामुळे पडले आहेत.
सीताराम एकांतात असताना इंद्राचा पुत्र जयंत रामाचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून रामाच्या मांडीवर निवांतपणे झोपलेल्या सीतेला कावळा बनून चोच मारू लागतो. तेव्हा रामानं त्याला हाकलण्यासाठी गवताची एक काडी (पातं) उचलून मंत्र म्हणून अस्त्रासारखी फेकून मारली ती कावळ्याच्या डोळ्याला लागून त्याचा तो डोळा फुटला. रामाचा स्पर्श झालेली वस्तू आपल्याला स्पर्श करून गेली याचं जयंताला समाधान वाटलं. पण कावळा मात्र त्या क्षणापासून एक डोळा असलेला (एकाक्ष) बनला.
अशा इतर अनेक कथा वाचायला मिळतात. त्या मनोरंजनाबरोबर उद्बोधन म्हणजे शिक्षणही करतात.
अशीच एक कथा आहे लसुणाबद्दल.
अमितगुणोऽपि पदार्थो दोषेण एकेन निंदितो भवति |
सकलरसायनमहितो गंधेन एकेन लश्‍वुन इव ॥
जगन्नाथ पंडितांचं हे सुभाषित आहे. अर्थ सरळ आहे. अनेक, असंख्य गुण असले तरी एकाच दोषामुळे एखादा पदार्थ निंद्य (निंदा करण्यास योग्य) ठरू शकतो. उदाहरण लसणाचं (लशुन) दिलं आहे. उग्र वास हा एकच दोष असल्यामुळे अनेक औषधी गुण असूनही (रसायनात म्हणजे औषधी पदार्थात श्रेष्ठ असूनही) लसूण हा दोषास्पद ठरतो.
यामागे एक मनोरंजक कथा आहे. समुद्रमंथनात निघालेल्या अमृताचं वाटप विष्णूनं अवतार (रुप) घेतलेली मोहिनी करत होती. दानवांना ती मदिरा वाटत होती तर दुसर्‍या खांद्यावर असलेल्या कुंभातलं अमृत ती देवांना वाटत होती. हे दानवांच्या रांगेत बसलेल्या राहूच्या लक्षात आलं. म्हणून अगदी ऐनवेळी त्यानं दानवांची पंगत सोडून तो देवांच्या पंगतीला बसला. त्यामुळेही त्यालाही अमृत वाढलं गेलं. पण विष्णूभगवानांच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे त्यांनी लगेच मोहिनीचं रुप टाकून विष्णूचं रुप घेऊन सुदर्शन चक्रानं राहूचं मस्तक धडावेगळं केलं. त्यावेळी त्याच्या गळ्यातून अमृताचा एक बिंदू जमीनीवर उडाला व त्या थेंबातून लसणाचं रोप उत्पन्न झालं. श्रावण महिना, चातुर्मास, मंत्राचं पुरश्चरण, ग्रंथाचं पारायण, अनुष्ठान अशा पवित्र काळात राक्षसाच्या गळ्यातून निघालेल्या रक्ताच्या थेंबापासून उत्पन्न झालेला लसूण खूप औषधी गुण असूनही निषिद्ध मानला जातो. काही सत्त्वशील, कर्मठ, ज्ञानी, तपस्वी मंडळी तर लसूण पूर्णतः वर्ज्य समजतात. असो.
आज कांदा, लसूण या उन्मादक वृत्ती निर्माण करणार्‍या धार्मिकदृष्ट्या अशुद्ध, त्याज्य मानल्या गेलेल्या पदार्थांवर खूप संशोधन झालंय- गंमत म्हणजे लसूण प्रत्यक्ष चालत नसला तरी हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी मानल्या गेलेल्या औषधात असलेला लसूण (लॅसोना) मात्र चालतो.
औषधांबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. अनेक औषधांच्या बाटल्यांवर अनुकूल गोष्टींबरोबर प्रतिकूल गोष्टीही (कॉंट्राइन्डिकेशन्स) लिहिलेल्या असतात. इतकं करूनही विषारी परिणाम (टॉक्सिक साइड इफेक्ट्‌स) होतातच. हाच संदेश देणारं एक सुभाषित आहे –
यथाविषं यथाशस्त्रं यथाऽग्निः अशनिर्यथा|
तथा औषधं अविज्ञातं विज्ञातम् अमृतोपम ॥
या सुभाषितात काही घातक, जीवघेण्या गोष्टींचा उल्लेख केलाय. विष, शस्त्र, अग्नी, इंद्राचं वज्र (अशनि) याप्रमाणेच घटक आणि त्यांचे परिणाम माहीत नसलेली औषधं घातक ठरू शकतात. औषधाविषयी सारी माहिती असेल तर मात्र ते अमृतासारखं असतं.
गुणकारी औषधाला ‘रामबाण’ औषध म्हणतात. म्हणजे रोगी हमखास बरा होणारच. याला रोगाचं परिमार्जन असं म्हणतात. याचे दोन प्रकार असतात. अंतःपरिमार्जन आणि बाह्यपरिमार्जन.
* तत्र अंतःपरिमार्जनम् यजन्तःशरीरमनुप्रविश्यौषधं आहारजात व्याधीन् प्रमार्ष्टि|
यत् पुनब्रहिः स्पर्शनमाश्रित्य अभ्यंग स्वेद परिषेकोनमर्दनाद्यैः आमयान प्रमार्ष्टि तद्बहिः परिमार्जनम् ॥
हे महावैद्य चरकाचं वचन आहे. अर्थ सोपा आहे पण गद्यरुपात असल्याने जरा दुर्बोध वाटतं. अनेक शब्द जोडून एक मोठा शब्द तयार झाल्यामुळं अर्थ समजणं जरा अवघड जातं. पण यातील मार्गदर्शन मात्र महत्त्वाचं आहे.
अर्थ ः- जे औषध शरीरात शिरून (इंटर्नल् यूज) आहारामुळे उत्पन्न झालेले रोग, विकार बरं करतं त्या औषधाला अंतःपरिमार्जन औषध म्हणतात.
जी औषधं बाह्य त्वचेवर लावतात (एक्स्टर्नल यूज) आणि अभ्यंग स्नान, घाम आणणे, लेप लावणे, चोळणे यातून रोगांचा नाश करतात त्यांना बाह्यपरिमार्जन औषधं म्हणतात.
दोन्ही प्रकारची औषधं प्रभावी असतात. पण पोटात, शरीरात घ्यायच्या औषधांबद्दल अधिक सतर्क राहावं लागतं. ‘फॉर एक्स्टर्नल यूज ओनली’ असं ज्या औषधांवर लिहिलेलं असतं त्यांचा उपयोग करून पाहायला आपली हरकत नसते. मलम, चूर्ण यासारखे त्वचेवर लावण्याचे उपचार आपण बेधडक करतो. म्हणजे त्यांचा प्रयोगतरी करून पाहतो.
हल्ली देशीविदेशी रोगी-निरोगी लोकांना माहीत असलेला आयुर्वेदिक उपचार म्हणजे पंचकर्म. यात चोळणे, रगडणे, तेल लावून मालीश करणे, रेचक (बस्ती) किंवा रेचन प्रक्रिया (पर्जिंग), बाष्प (अभ्यंग) स्नान इ. गोष्टी समाविष्ट असतात. यामुळे रोगांबरोबरच इतर सर्वसामान्य आरोग्य राखणार्‍या गोष्टीही (औषधाविना इलाज) सांभाळल्या जातात.
‘किरातार्जुनीय’ नावाचं एक संस्कृत नाटक आहे. त्यात मुख्यतः रानातल्या पशूंची शिकार करणारा (किरात) जो मुळात शिवशंकर आहे, त्याचं आणि अर्जुनाचं द्वंद्वयुद्ध आहे. अर्थातच धनुष्यबाण, अस्त्रं यांनी केलेलं युद्ध. दोघंही तोडीस तोड ठरतात. प्रसन्न होऊन शिवशंकर आपलं पाशुपतास्त्र अर्जुनाला देतात. त्यात एक सुभाषित आहे ज्यात औषधाच्या प्रभावाचा उल्लेख आहे.
परिणामसुखे गरीयसि
व्यथकेऽस्मिन् वचसि क्षतौजसाम् |
अलिवीर्यवतीव भेषजे
बहुः अल्पीयसि दृश्येत गुणः ॥
अत्यंत प्रभावी पण अतिशय थोड्या प्रमाणात घेतल्या जाणार्‍या औषधाचे गुण महत्त्वाचे असतात. अशा औषधासारखं अतिशय अल्प भाषणही परिणामी सुखकारक पण गंभीर तसेच दुबळ्या व्यक्तीच्या मनात पीडा उत्पन्न करणारे आहे. केवळ रोग बरा करणं हा तात्कालिक उपाय झाला. पण रोग बरा करुन शिवाय टिकाऊ आरोग्याचा लाभ नि अनुभव जे औषध करून देते ते खरं गुणकारी असतं.
तदेव युक्तं भैषज्यं यदारोग्याय कल्पते |
हल्लीची एकूणच औषधयोजना हे रोगाची लक्षणं बरी करणारी (सिंप्टमॅटिक ट्रीटमेंट) अशा प्रकारची असते. रोगाच्या मुळापर्यंत जाऊन तो कायमचा बरा करणं हा विचार दोन कारणांसाठी मागे पडलाय. यासाठी लागणारा वेळ अन् सारं कसं झट की पट (इन्स्टंट) हवं असणारी जीवनशैली!
औषधाबद्दल पवित्र भावना हवी. त्याबरोबरच ते देणार्‍या वैद्यावर म्हणजे त्याच्या अनुभवावर, ज्ञानावर मुख्य म्हणजे त्याच्या सेवावृत्तीवर विश्‍वास हवा. यामुळे वैद्यांच्या एकूणच उपचारपद्धतीत आश्चर्यकारक हातगुण दिसून येतो.
औषधं जान्हवीतोयम् ॥ किंवा आपोनारायणोहरी ॥
अशा सूत्रात शुद्ध अशा गंगोदकाचं माहात्म्य सांगितलंय, त्याचप्रमाणे-
औषधं चिंतयेत् विष्णुम् ॥
म्हणजे औषध घेताना विष्णूचं चिंतन करावं. एक संवाद अनेक चित्रपटात किंवा दूरचित्रवाणीच्या मालिकांमध्ये ऐकायला मिळतो. ज्यावेळी सर्व प्रकारची उपाय-उपचार योजना करूनही अपेक्षित गुण येत नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात-
‘अब दवासे नहीं दुवासे काम लेना चाहिये|’ तसं पाहिलं तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रयत्न आणि प्रार्थना या दोहोंचाही उपयोग होतो- पण आधी भरपूर प्रयत्न केल्यावर मग परमेश्‍वराकडे वळणं योग्य असतं नाही का? म्हणूनच म्हटलंय ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’.