होळीपौर्णिमा

0
171
  • मीना समुद्र

होळीत हीन जाळून सत्य, शील, प्रेम, विश्‍वास, सदाचार, निर्मळपणाचा साक्षात्कार घडवून जीवन रंगविणारी ही होळी आणि तिच्यासवे येणारी रंगपंचमी ही सर्वांच्याच आयुष्यात नित्यनूतनतेचा आनंद निर्माण करो, याच होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!!

आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळीपौर्णिमा. आपल्या ग्रामीण भागात ही पौर्णिमा ‘होळीपुनव’ या नावाने ओळखली जाते. तसेच हुताशनी शिमगा, कामदहन अशा स्वरूपात हा फाल्गुनोत्सव, हा लोकोत्सव साजरा होतो. मुख्यत्वेकरून हा पुरुषांचा सण मानला जातो.
होळी जवळ आली की मुले ‘होळीला गवर्‍या पाच पाच, डोक्यावर घेऊन नाच नाच’ असे म्हणत घराघरांतून गोवर्‍या (शेणी) गोळा करतात. शिमग्याची सोंगेही काढली जातात. विशेषतः ग्रामीण भागात या प्रथा आजही आहेत. शहरी भागात वर्गणी गोळा करून होलिकादहनासाठी साहित्य जमविले जाते. गटागटाने होलिकादहन केले जाते.

पौर्णिमेच्या रात्री शेतात, पटांगण, मैदान, अंगण अशा मोकळ्या जागी होळी पेटवली जाते. पोफळी, माड, ऊस किंवा एरंडाचे खोड जमिनीत खड्डा खणून रोवले जाते. ते खोड मध्ये उभे ठेवून गायीच्या शेणाच्या सुकविलेल्या गोवर्‍या, गवताच्या पेंड्या त्याभोवती शंकूच्या आकारात रचतात. घरचा पुरुष (घरधनी) होळी पेटवून तिची पूजा करतो. होळीत नारळ फेकतो. घरधणीन व इतर स्त्रियाही वाड्यावस्तीवर जाऊन होळीची पूजा करतात आणि पुरणपोळी वा इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तो होळीला अर्पण करतात. घरचे व जमलेले सर्वजण ‘होलिकाय नमः’ असा मंत्र म्हणत तिला नमस्कार करून प्रदक्षिणा घालतात. होळी धडाडून पेटते तशी पुरुषमाणसे, मुले तोंडावर हात घेऊन बोंब ठोकतात. यालाच ‘शिमगा’ असे म्हटले जाते. यावेळी मनातले वाईटसाईट शिव्या देऊन बाहेर काढले जाते. अपवित्र, अमंगल असे सारे होळीत जळून मंगल उरावे आणि जीवन पवित्र, शुद्ध व्हावे असा यामागचा खरा हेतू असतो. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणहानी होते म्हणून ‘होळी सजवा’, ‘झाडे लावा’ असा संदेश आजच्या काळात दिलेला आठवतो.

आता मुद्दाम अशी आग पेटवून मग हे सर्व करण्याचे कारण काय? तर त्यामागे दोनचार प्राचीन कथा आहेत, आणि त्यामुळे पडलेले हे रीतिरिवाज आणि समजुती आहेत. त्यातली एक म्हणजे हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा विष्णुभक्त पुत्र होता. विष्णू पित्याला आवडत नसूनही प्रल्हाद विष्णुभक्ती सोडायला तयार नसल्यामुळे हिरण्यकश्यपूची बहीण धुंडा किंवा होलिका हिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळी पेटवून जाळण्याचा डाव रचला. त्या राक्षसीने असा वर प्राप्त केला होता की ती आगीत जळणार नाही. पण जर ती वाईट हेतूने काम करेल तर मात्र तिचा विनाश होईल. आणि झालेही तसेच. बालप्रल्हाद धगधगत्या आगीतूनही बचावला आणि त्याची क्रूरकर्मी आत्या मात्र त्या आगीत जळून भस्मसात झाली. वाईट विचारांचे, कृतींचे दहन होळीत झाले आणि सत्य, मंगल अशी भक्ती जिवंत राहिली. आणखी तेजाळून बावनकशी सोन्यासारखी खरी उतरली. या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतीकरूपाने घरोघर, वस्तीवर, गावात, शहरात होलिकादहनाची प्रथा सुरू झाली.
बालकृष्णाने कंसाकरवी आलेल्या पूतना राक्षसीला ठार मारले आणि तिचे धूड कृष्णसवंगड्यांनी होळी पेटवून जाळले. कोणत्याही रूपात आले तरी असत्य, दुष्कर्म लपत नाही आणि त्याचे परिणाम ते धारण करणार्‍याला भोगावे लागतात. आसुरी शक्तींवर दैवीशक्तीचाच विजय होतो आणि हे सार्वकालीन सत्य आहे याचीही आठवण होळीद्वारे केली जाते. आपल्या कृष्णसख्याला मारण्यासाठी आलेल्या त्या राक्षसीचा निःपात केल्यामुळे सवंगड्यांना चेव चढून तिच्याबद्दल अर्वाच्च शब्दही त्या गोपबालांनी उच्चारले असतील आणि आनंदाने भोवती तिच्या नावाने शंख करीत नाचले असतील तर त्यांची ती वर्तणूक वावगी नव्हे. शिंग, तुतार्‍या नसल्या तरी पिपाण्या वाजवून, ढोल बडवून, काठ्या बडवून त्यांनी आनंद साजरा केला असेल. या सर्वांची पडछाया आजच्या होलीदहनाच्या प्रथेवर दिसते.

तसेच एका वाचलेल्या कथेतही पाहायला मिळते. एका गावात मुलांना पळवून नेणारी स्त्री ही ग्रामीण लोकांना राक्षसी, भुतनी, हडळ वाटल्यास नवल नव्हे. तर अशा एका कैदाशिणीला भिववून पार पळवून लावण्यासाठी लोकांनी मोठ्ठी आग लावली आणि त्या स्त्रीला शिव्याशाप दिले. अशा प्रकारे दुष्टबुद्धी, दुर्जनवृत्ती, खलनाशन हे होळीचे काम आहे. निर्भय बनण्यासाठी, अमंगलाचा नाश करण्यासाठी आजही होळी पेटवली जाते.

तपःसाधनेत व्यग्र असणार्‍या शिवशंकराच्या मनात मदनबाधा निर्माण व्हावी आणि शिवपार्वती मीलनाने निर्माण झालेल्या पुत्राकडून तारकासुरादी असुरांचा संहार व्हावा म्हणून देवांनी कामदेवाला त्या कामावर नियुक्त केले तेव्हा अनुरागी कामदेवाने सर्वत्र फुले, फळे आणि जीवासक्ती निर्माण केली. शंकराची समाधी उतरली आणि तपोभंगामुळे त्यांनी तिसरा डोळा उघडून कामदेवाला म्हणजेच मदनाला जाळून भस्मसात केले. तोच हा होलिकादहनाचा दिवस. सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मनात प्रीती उत्पन्न करण्याचे काम कामदेवाचे- मदनाचे! तेच थांबल्यामुळे सृष्टीवर आकांत सुरू झाला. विनाशध्वनी म्हणून शंखध्वनी केला गेला. हा शोकध्वनीही होता. कामदेवाची पत्नी रतीने विलाप सुरू केला तेव्हा शिवशंंभूने उःशाप दिला आणि सृजनकार्य सुरू झाले. या घटनेची आठवणही होळीपौर्णिमेला केली जाते. चांगल्या गोष्टींचा, नव्याचा संकल्प केला जातो.

मात्र होलिकादहन हे फक्त प्रतीकात्मक नसून वैज्ञानिकदृष्ट्याही त्यातले तथ्य उलगडण्याचे काम सतत चालू आहे. शारीरिक, मानसिक, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीनेही हा सण महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ग्रामीण आणि शहरी भागातही या सणाचे स्वागत होते. मानवी मनात नेहमीच सृष्टीचे प्रतिबिंब पडलेले असते. निसर्गातल्या ऋतुबदलाप्रमाणे माणसाचे आचार, विचार, कृती आणि व्यवहार घडत असतात. त्यामुळेच सृष्टीला हानीकारक असे विषाणू, जीवजंतू आणि अपायकारक वनस्पती या सर्वांचे उच्चाटन होळीद्वारे केले जाते. होळी शांत झाल्यावर दूध, पाणी शिंपडून ती राख अंगाला लावून दुसर्‍या दिवशी ‘धूलिवंदन’ केले जाते. सर्व औषधियुक्त सामग्री जाळली जात असल्याने होळीची राख त्वचेसाठी आरोग्यकारक ठरते. उष्म्यामुळे निर्माण होणार्‍या रोगांचे शमन होते. वातावरण शुद्ध होते. झाडांना, वनस्पतींना उपयुक्त असा कार्बन डाय ऑक्साईड वायू निर्माण होतो आणि वसंतातील चैत्रपालवीसाठी तो वरदान ठरतो. वृक्षबहर प्राणवायू आणि सुखद सुगंध निर्माण करतात असेही ऐकण्यात आले. होळीत मनातले दुष्ट विचार, रागलोभ, द्वेष-मत्सर जाळून टाकून साचलेली कटुता, भांडणे, शिव्याशापाद्वारे बाहेर काढली गेल्यामुळे, दुःखशोक आवेग हे सारे शंखध्वनीद्वारे मोकळेपणाने व्यक्त झाल्यामुळे मनाचे आरोग्यही चांगले होते. घर आणि बाहेर सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्यामुळे बंधुता, समभाव, ममत्व वाढते. भोजनाला अमृताची गोडी येते.

होळी ही भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीचा आरसा आहे. आसाम, बंगाल, बिहार, उ. प्रदेश, महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी होते. धूलिवंदन किंवा धूळवडीदिवशी धूळफेक, मातीपाणी चिखलफेक होतेच, पण होळी आणि धूलिवंदन हे रंग खेळण्याचे दिवस असतात. ते दोन दिवस, पाच दिवस असे उत्साहाचे, उल्हासाचे आणि सृष्टीच्या शतरंगी रंगून जाण्याचे असतात. आणि स्वतःच्या जीवनात रंगाद्वारे रंग भरण्याचे आणि जीवन रंगीत करून सोडण्याचे असतात. ‘फागुन के दिन चार होरी खेल मना रे’, ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’, ‘होली आयी रे कन्हाई’, ‘श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया’, ‘मन हो रामरंगी रंगले’ अशा गाण्यांतून उत्कट प्रीतीचे, भक्तीचे, सात्विकतेचे, नटखट उल्हासाचे असे रंग उधळले जातात. हास्य-व्यंग्य-कवितांचे कार्यक्रम रंगतात. नको असताना रंग उडला तरी चिडायचे नाही हा संकेत असतो. मंदिरांतून गुलाल उधळला जातो आणि रंग खेळायला सुरुवात होते ती अंतर्बाह्य भिजेपर्यंत. बांबूच्या पिचकार्‍या आता शेकडो प्रकारच्या, आकाराच्या प्लास्टिक पिचकार्‍यांत बदलल्या आहेत. डबे, बाटल्या, मग काहीही चालते. रंग उडवून आणि उडवून घेऊन मुक्त आनंदाची वाट चालणे हेच रंगपंचमीचे, होळी खेळण्याचे, रंग खेळण्याचे मुख्य उद्दिष्ट. होळीत हीन जाळून सत्य, शील, प्रेम, विश्‍वास, सदाचार, निर्मळपणाचा साक्षात्कार घडवून जीवन रंगविणारी ही होळी आणि तिच्यासवे येणारी रंगपंचमी ही सर्वांच्याच आयुष्यात नित्यनूतनतेचा आनंद निर्माण करो, याच होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!!