प्रख्यात हॉलिवूड अभिनेते व निर्माते मायकल डग्लस यांचा 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठेचा ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती काल केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त अभिनेते मायकल डग्लस हे इफ्फीसाठी त्यांची पत्नी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या कॅथरिन झिटा जोन्स, अभिनेता व पुत्र डायलन डग्लस यांच्यासह हजर राहणार आहेत. दरम्यान, भारतीय चित्रपट निर्माते व सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलचे संस्थापक शैलेंद्र सिंग हेही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराची सुरवात 1999 मध्ये 30 व्या इफ्फीमध्ये झाली होती. यंदाचे पुरस्कार विजेते मायकल डग्लस यांना दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार व एक एमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डग्लस यांनी ‘वॉल स्ट्रीट’, ‘बेसिक इन्स्टिंक्ट’, ‘फॉलिंग डाऊन’, ‘द अमेरिकन प्रेसिडेंट’ आदी चित्रपटांद्वारे चित्रपट जगतात आपला ठसा उमटवला आहे.