हॉटेल्स, निवासी सोसायट्यांचा कचरा स्वखर्चाने उचलणार

0
110

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती

>> मनपा आयुक्तांनी दिला होता नकार

पणजी महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील तारांकित हॉटेल्स आणि काही निवासी सोसायट्यांना नोटिसा पाठवून कचरा उचलणार नसल्याचे कळविले असले तरी या हॉटेल्स आणि निवासी सोसायट्यांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. या हॉटेल्स व सोसायट्यांतील कचरा महानगरपालिकेने न उचलल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खासगीरीत्या कचरा उचलण्याची व्यवस्था केली जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल सांगितले.

पणजी महानगरपालिकेची बायंगिणी, ओल्ड गोवा येथील कचरा प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेली जमीन सरकारकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेली आहे. परंतु, दोन वर्षे उलटली तरी त्या जागेत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात अद्यापपर्यंत यश प्राप्त झालेले नाही. कचरा प्रकल्पाअभावी कचरा विल्हेवाटीची समस्या भेडसावत आहे. कचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने मनपा मंडळाची बैठक घेतली जाऊ शकत नाही. आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर महानगरपालिका मंडळाची बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. आयुक्तांनी कचरा उचलणे बंद करण्याबाबत नोटीस पाठविताना मंडळाला विश्वासात घेतलेले नाही, असा दावा महापौर मडकईकर यांनी केला.

गटारे उपसणे
३१ मे पर्यंत पूर्ण
महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांतील गटारांतील कचरा उपसण्याचे काम येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. रस्त्यावरील खड्‌ड्यांचे फोटो पाठविण्यात येत असलेल्या ठिकाणचे खड्डे तात्पुरते बुजविण्यात येत आहेत. केबल व इतर कामांसाठी रस्ता खोदताना महानगरपालिकेला विश्वासात घेतले जात नसल्याने रस्त्यावरील खड्‌ड्यांचा त्रास नागरिक व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. रायबंदर येथे रस्ता खोदताना जलवाहिनीची नासधूस करण्यात आल्याने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रायबंदर येथील खोदण्यात आलेला मुख्य रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावा, अशी मागणी महापौर मडकईकर यांनी केली.