हे निसर्गराजा…

0
137
  •  कालिका बापट

निसर्गराजा तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हा मानवाचा ध्यास असतो. परंतु जन्म सफळ बनविणे हा तुझ्या असण्याचा साक्षात्कार असतो. तुझ्यातच जगणे, तुझ्यातच रूजणे आणि शेवटी तुझ्यातच विलिन होणे हेच तर सत्य आहे. ज्याची जाणीव तू मानवाला सदोदित करीत असतो.
तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हे प्राणीमात्रांचे परमभाग्य. तुझ्या सौंदर्याच्या वेडाने चराचराला पडलेली भूल तुझ्याकडे परत येण्याचे निमित्त असते.

सागराची अथांगता
नभाची विशालता
निर्झराची खळखळ
वार्‌याची सळसळ
मातीचा गंधमोहर
वनराईची हिरवी शोभा
सूर्याचे झळाळते तेज
कुसुमलतांची कोमलता
पक्ष्यांची मृदु मधुर सुरावली
क्षितिजावर उधळलेली निळाई
सरीतेचा प्रवाह झुळझुळता
अग्नीची तेजोमयी ज्वाळा
हे निसर्गराजा…
हे सृजन प्रणेत्या
प्रांजळ एक मागणे
दातृत्वाची वस्त्रे
कर्तव्यांची शस्त्रास्त्रे
तू बहाल कर मला
सामावून घे तुझ्या अंतरंगात
रूजू दे मला तुझ्यात
पुन्हा उगवण्यासाठी नव्याने
तुझेच प्रतीरूप बनून…
हे निसर्गराजा
तूच निर्माता, तूच मायबाप
दे सौख्याचे, आनंदाचे
आशीर्वचन आम्हा…

हे निसर्गराजा तुझाच भाग असलेले आम्ही पुन्हा पुन्हा रूजत असतो तुझ्यात, आमच्या अस्तित्वाला जागवत तुझ्यातच लीन होतो अनंतात विहरण्यासाठी. जन्म, मृत्यू हे असत्य जरी, तू तेवढे सत्य आहेस. म्हणूनच तुझ्या असण्याचा आनंद हा सर्वातीत आहे. हे निसर्गराजा तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हा मानवाचा ध्यास असतो. परंतु जन्म सफळ बनविणे हा तुझ्या असण्याचा साक्षात्कार असतो. तुझ्यातच जगणे, तुझ्यातच रूजणे आणि शेवटी तुझ्यातच विलिन होणे हेच तर सत्य आहे. ज्याची जाणीव तू मानवाला सदोदित करीत असतो.

तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हे प्राणीमात्रांचे परमभाग्य. तुझ्या सौंदर्याच्या वेडाने चराचराला पडलेली भूल तुझ्याकडे परत येण्याचे निमित्त असते. हे निसर्ग देवते, दे वरदान जगण्याचे, तुझ्यात रंगण्याचे. सागराची अथांगता, मनाचे औदार्य बळावते. त्याची निळाई शांतीची शिकवण देणारी. या सागराला जेव्हा भरती येते, तो जेव्हा भयाण रूप घेतो, तेव्हाही माणसाला त्याच्या असण्याचे भान करून देतो. राग, लोभ असतोच असतो मानवात. जेव्हा स्वत्वाला ठेच लागते, तेव्हा सागराच्या लाटांची गाज मनात उसळू लागते. तेव्हा मग माणूस स्थिर तो कसला? स्वाभिमानाचे बीज तूच तर पेरले आम्हा मानवांच्या नसानसात.

हे सृजन प्रणेता, तू निर्माता या सौंदर्याचा. तुझ्या एका दृष्टीक्षेपानेच चराचर पावन होते. तू गंध भरतो फुलांफुलांत. तू रंग सांडतो पानापानांत. तुझ्या अमर्याद सौंदर्याचे वेड सार्‍यांनाच. अगदी मलाही. तुझे गुणगान गाण्यासाठी शब्दही होतात सुंदर… तुझ्यासारखेच. तुला शब्दांमध्ये गुंफुन घेताना काव्यरूप साकारते. हे वनश्री, हे वनदेवते तुझ्या सौंदर्याची कशी आणि किती वर्णू महती ?

रामप्रहरी, भल्या पहाटे अगदी अंधारात चिवचिवणार्‍या जीवांचा किलबिलाट कानी पडल्यावर तुझ्या असण्याचे भान होते. हळुहळु रात्र जशी मालवत जाते तशी सोनेरी किरणे आसमंतातून डोकावू लागतात. सूर्याचे तेजोवलय, त्या सोनपिवळ्या किरणांच्या लड्या धरतीवर यायला आतुरलेल्या असतात. ही उन्हाची किरणे पानांपानांवर सांडू लागतात, सोनेरी थेंबांतून नाचू लागतात. मग कुठले भान ते राहाणार ? हे सारे टिपायला तुझ्यासारख्या भावूक सौंदर्य वेड्याची साथ लागते आणि ती साथ तू करतोस मनापासून. उन्हं डोक्यावर यायच्या आत तुला मनसोक्त पाहून घ्यावं. तुझे ते सौंदर्य मनमुराद लुटावं हीच तेवढी आस असते. तुला मी कुठल्या रूपात पाहू? तुझी सारीच रूपे लाघवी, मनभुलवी. मग कशाला उगीचच विचारायचे? लुटायचा मनमुराद आनंद तुझ्या संगतीत.

ऋतूंना सोबत करताना तुझे सौंदर्य अधिकच खुलत असते. बहरत असते. त्याचीच साक्ष म्हणून काय जणू अवघ्या सृष्टीला त्या त्या कालात बहरायचे वेड लागते. अगदी माझ्यासारखेच फुलायचे वेड लागते. आत्ताच कुठे वसंत सुरू झाला म्हणता म्हणता, ग्रीष्माने हळूच मान डोकावली आहे. उन्हाची तिरीप सोसवेनाच. तरीही तुझ्या सौंदर्याला जणू बहरच चढला आहे. रसरसलेल्या फळांचा गंध चोहीकडे पसरल्यामुळे पक्षी, पाखरं वेडावलेली आहेत. त्या गंधाचे माधुर्य लेऊन फुलांफुलांमधला मध चाखीत पराग कण पेरीत नाचताहेत. हा ऋतुसंहार की ऋतुसंभार? एकीकडे ग्रीष्माचा उष्ण तडाखा, तरीही तुझी ही नवलाई. एकीकडे उन्हाने व्याकुळ होणारा जीव, तर यातच मनावर तृप्तीचा शिडकावा देणारा रसगंधाचा खजिनाच समोर मांडलेला. वाटतं नकोच हा उन्हाळा म्हणताना, या उन्हाळ्यातील नवलाईला कवेत घ्यावेसे वाटणे, केवढा हा लळा जगण्याचा. अंगांगाची लाही लाही करीत ग्रीष्म सरेलही. सौंदर्याने नटलेल्या अवनीचे सुंदर रूप कायम राखीत हे निसर्गराजा तू पुन्हा बदलशील कुस नव्या ऋतूने. सृजनोत्सवाचा ध्यास घेऊन नभाकडे दृष्टी लावून बसलेलो आम्ही त्या पर्जन्य सोहळ्याची वाट पाहू. काय असतो तो सोहळा?…अहाहा…!!! पावसाची पहिलीच सर अगदी नसानसात भिनत जाते. वर्षभर त्याची वाट पाहात असलेलो आम्ही त्याला कवेत घेऊन नाचत असतो, धावत असतो. तुझ्या या पावसामुळेच तर आम्ही नादावलो आहोत. थोडक्यात काय तर, पावसाबरोबरच आम्हीही तुझ्या प्रेमात वेडावलो आहोत.

हे निसर्गराजा.. मला तुझी नवलाई वेड लावते. काय काय म्हणून सांगू? कसे कसे करू तुझे वर्णन? तू व्यापले आहेस सारे जग तुझ्या अमर्याद सौंदर्याने. या सौंदर्याची भुरळ तर सार्‍या जगाला पडते आहे. उंचच उंच तरू, झाडे, वेली, फुले, कळ्या या सार्‍यांमध्ये तुझ्या सौंदर्याचा अंश असल्याने तेही भुलवतात. आम्ही मानवही काय कमी नाहीत. तुझ्यातला अंश आमच्यात आहे म्हणून तर आम्हीही तुझ्यासारखेच सुंदर आहोत. परंतु कधी कधी आम्ही मानव आमचे मूळ विसरतो आणि तुझ्यावरच घाव करतो. तुझ्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव असूनही कधी कधी काणाडोळा होतो. हे निसर्गराजा, आम्ही सारेच काय क्रूर नाही आहोत. तुझाच अंश आम्ही, तुझाच एक भाग आम्ही तेव्हा तुझ्या सात्विकतेच, सौंदर्याचा काहीसा भाग आमच्यात असणारच. गरज आहे ती केवळ भानावर येण्याची. त्यासाठी तुझी वेळोवेळी होत असलेली सोबत पुरेशी असते. शेवटी काय भले बुरे हे प्रत्येकाच्या हातात असते.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे, आळविती
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे तुकाराम महाराज, हे निसर्गराजा वृक्षवल्लींना, सर्व चराचरांना ते आपले सगे सोयरे मानतात. आपणांस मायबाप मानणार्‍या या संतांनी टाहो फोडून तुझ्या संरक्षणाचा संदेश दिला आहे. तरीही आम्ही मस्तावलेलो कधी कधी वेगळ्या वाटेने जातो. असो!
कधी वाटतं मी माणूस नव्हे, सुंदरशा बागेतील एखादा मोगर्‍याचा वेल असायला हवा होता. माझ्या अंगावर उमलणार्‍या सफेद चांदण्यांचा गंध मी हळूवार शिंपला असता मनामनात. आणि हे निसर्गराजा तुझ्या आशिष वचनाने माणसांच्या मनात प्रेमाचे सिंचन केले असते मी. दूरवर सुगंध पसरीत सद्भावनेचा, विश्वशांतीचा संदेश देत मनामनात प्रेम जागवले असते मी. कधी वाटतं, झाडांवर, छपरावर धावणारी छोटीशी खार असती तर? छोट्या छोट्या जीवांनाही हक्क असतो जगण्याचा हे पटवून दिले असते. खारीचा वाटा काय असतो हेही कळले असते. पडणारी, धडपडणारी, उठून पुन्हा धावणारी मुंगी असती तर आम्हीही करतो काम, आम्हीही गाळतो घाम हे शांतपणे सांगितले असते. भल्या पहाटे अंधारात शेतांच्या कडेवर बसून चिवचिवणारी एखादी छोटीशी टिटवी असती तर टिटवीलाही असते स्वत्वाचे भान, असतो तिलाही स्वाभिमान हे अभिमानाने सांगितले असते. पुराणात या टिटवीची आणि तिच्या जोडिदाराची सुंदरशी कथा आहे. स्वत्वाच्या रक्षणासाठी टिटवीने अख्खा समुद्र पालथा घातला होता. शेवटी शेषशायी भगवान विष्णूलाही तिचे मागणे मान्य करावे लागले. तर हे सृष्टीराजे, तुझ्या सहवासातील जगणे हे अलौकिक असे देणे. विश्वव्यापी आनंदाचे आंदण असा तुझा सहवास.

या ब्रह्मांडातील तुझे वास्तव्य म्हणजेच आमचे जीवन. तू नाही तर मग काहीच नाही. चराचरांना, सार्‍या प्राणिमात्रांना जगवणारा तू…तुझी महती सांगताना शब्दांना पंख लाभतात. मग ही शब्दपाखरे तुझ्यात समरसून जाऊन तुझे गुणगान गात भिरभिरत उंचच उंच झेप घेतात. हे सृष्टीविराजा, तुझी सोबत लाख संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देते. तुझ्यातच सामावले आहे चैतन्य, ईशशक्तीचा साक्षात्कार. तुझ्यातच पाहावे विश्वेश्वराचे डोळे भरून रुप. तुझ्यातच सामावून घ्यावे स्वत:ला. हा प्रिय पाऊसच बघ ना! नभातून पाझरत, धावत, सुसाटत येतो धरतीवर. क्षणार्धात मातीत पहुडलेली बीजे शिरशिरून जागी होतात. नवजीवन खुलते. बीजाचा वृक्षापर्यंत होणारा प्रवास हे परिवर्तन तुझ्याचमुळे तर घडते. बीजांकुराला लाभलेली चैतन्य शक्ती वृक्ष होईपर्यंतचा हा त्याचा प्रवास अनुभवताना आपल्याही जीवनात नवीन ऊर्जा प्राप्त होते. त्या वृक्षावरील पाने, फुले, फळे आणि मग त्या फळांमधून पुन्हा तयार होणारी बीजे सृजनाचा संकेत देऊन जातात.
हे सृष्टीप्रिया, तुझ्या अंतरंगाचा मी छोट्टासा बिंदू. तरीही ओढ तुझ्याकडे. कारण माझ्या अस्तित्वाला न्याय देणारा तू. तू माझ्यातच आहेस.. माझ्या पिंडातला निसर्ग बनून. असं म्हणतात पिंडी तेच ब्रह्मांंडी. जे जे ब्रह्मांंडात अस्तित्वात आहे. ते, ते देहरूपी पिंडात आहे. हा सिद्धांंत केवळ तुझ्यामुळे मी मानते हे वनप्रिया. तूच आहेस आणि अंती तूच राहाणार आहेस हे एकच सत्य पुरेसे आहे मानवाला जीवन जगण्यासाठी. निसर्ग म्हणजेच जीवन आणि जीवन म्हणजेच निसर्ग हे सत्य जेव्हा सकारात्मकतेचे रूप घेते तेव्हा जगण्यातला आनंद दुणावतो, बळावतो. हे पर्जन्यप्रिया, तुझी साथ हवी आम्हा मानवांना. अखंड साथ.