हे तर सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याचे द्योतक

0
37

>> इंधन दरवाढीवरून कॉंग्रेसची टीका

केंद्रातील व गोव्यातील भाजप सरकार स्वयंपाक गॅस सिलिंडरचे दर भरमसाठ किमतीने वाढवत सर्वसामान्य लोकांच्या भावनाशी खेळत आहे. सरकार आर्थिक दृष्टीने डबघाईस आले असल्याचे हे द्योतक असल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केला. दक्षिण गोवा जिव्हा कॉंग्रेस कार्यालयात काल घेतलेल्या या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष ए. के. शेख, प्रवक्ते डॉ. आशिष कामत, जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, सचिव एव्हरसन व्हेलीस उपस्थित होते.

गणेशोत्सव केवळ आठवड्यावर येऊन ठेपलेला असतानाच या सरकारने गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपयांनी वाढ केली आहे. दि. १ जानेवारी रोजी ७१० रुपये किंमत असलेल्या गॅसची आज किंमत ९०० रुपये झाली आहे. त्यामुळे आता सरकारला ही जनता माफ करणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पी. चिदंबरम आज गोव्यात
कॉंग्रेसचे नरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आज शुक्रवार दि. ३ रोजी गोवा भेटीवर येत आहेत. तसेच गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, तीन निरीक्षक प्रकाश राठोड, मन्सूर खान व सुनील हनुमन्नावर हेही गोव्यात येणार आहेत अशी माहिती श्री. चोडणकर यांनी यावेळी दिली.
आज दि. ३ रोजी संध्याकाळी ६ वा. ते ताळगाव गटाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्या दि. ४ रोजी सकाळी १०.३० वा. निवडणूक समितीचे अध्यक्ष, निमंत्रक यांची बैठक घेतील. १२ वा. नवनियुक्त गटाध्यक्षांशी चर्चा करतील. ६ वा. मडगाव गटाच्या बैठकीत ते उपस्थित राहतील. दि. ५ रोजी सकाळी १०.४५ वा. भारतीय राष्ट्रीय युवा कॉंग्रेसची बैठक, ११ वा. सांत आंद्रे, १२.१५ वा. कुठ्ठाळी गटाची बैठक घेणार असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले.