ही वेळ युद्धाची नव्हे ः मोदी

0
2

रशिया व युक्रेनला पंतप्रधानांचा सल्ला

रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून संघर्ष सुरू आहे. युक्रेन-रशियातील हा संघर्ष थांबण्यासाठी काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर भाष्य करताना ही वेळ युद्धाची नव्हे असा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सल्ला दिला आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा पॉडकास्ट काल 16 मार्च रोजी प्रसारित झाला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात पंतप्रधान मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ‘ही वेळ युद्धाची नाही असे मोदींनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आमचे मित्र राष्ट्र आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर बसून मी त्यांना म्हणू शकतो की ही युद्धाची वेळ नाही. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही मी मैत्रीपूर्ण तसेच सांगू शकतो असे सांगून मोदी यांनी, रशिया आणि युक्रेन संघर्ष केवळ चर्चेनेच संपेल हे भारताने अनेक वेळा स्पष्ट केले असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानबाबत बोलताना मोदींनी भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, आम्हाला प्रत्येकवेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला. पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या आपले प्रयत्न असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे लोकही हिंसाचार, दहशतीला कंटाळले असून त्यांनाही शांतता हवी असल्याचे पुढे बोलताना मोदींनी सांगितले.