हायपर-थायरॉइडिझम

0
170
  • वैद्य स्वाती अणवेकर
    (म्हापसा)

औषध- आहार- विहार ह्यासोबत व्यायामसुद्धा तेवढाच आवश्यक आहे व्यायामात धावणे, जॉगिंग वगळून चालणे, स्पाइन वॉक, सायकल चालवणे, पोहणे, वॉटर एरोबिक्स असे व्यायाम करावे. तसेच जड व्यायाम न करता मध्यम प्रमाणात व्यायाम करावा.

जर तुम्हाला छातीत धडधडणे, हातपाय थरथरणे, अचानक वजन कमी होणे, उष्णता सहन न होणे अशा तक्रारी जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला हायपर-थायरॉइडिझम हा थायरॉइडचा आजार तर नाही ना… हे नक्की तपासून घ्या.

नेमके काय आहे हायपर-थायरॉइडिझम्?
हायपर-थायरॉइडिझम् हा असा आजार आहे ज्यात थायरॉइड ग्रंथीचे कार्य वाढते, ती अतिक्रियाशील होते. अर्थात ह्यामध्ये जेव्हा आपणथायरॉइड फंक्शन टेस्ट करतो तेव्हा टी३ आणि टी४ हॉर्मोनचे प्रमाण जास्त असते तर टीएसएच्‌ची पातळी खूपच कमी असते. या रोगाचे प्रमाणसुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये जास्त आढळून येते.
हायपर-थायरॉइडिझमची लक्षणे
१) हृदयाची गती वाढणे
२) हात पाय थरथरणे
३) घाम येणे
४) रक्तदाब वाढणे
५) खूप भूक लागणे
६) पुष्कळ खाऊनसुद्धा वजन कमी होणे
७) उष्णता सहन न होणे
८) मासिक पाळीच्या वेळी भरपूर स्त्राव होणे
९) अशक्तपणा
१०) झोप न लागणे,
११) नैराश्य
१२) एकाग्रता कमी होणे
१३) केस गळणे
१४) अंगाला खाज येणे
गंभीर आजारामध्ये थायरॉइड ग्रंथी सुजते. तसेच डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात ज्याला एक्झोथॅलॅमस असे वैद्यकीय परिभाषेत म्हणतात.

हा आजार कोणाला होऊ शकतो ?
तर हा आजार ज्यांना ग्रेव्ह्ज नावाचा आजार आहे त्यांना किवा ज्यांना थायरॉइड नोड्यूल आहे त्यांना तसेच थायरॉइडायटीस अर्थात थायरॉइड ग्रंथीला सूज असेल तर किवा जेवणात आयोडिनचे प्रमाण अधिक असेल तर होऊ शकतो.

डॉक्टर ह्या व्याधीचे निदान करत असताना रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे ऐकून व पाहून सोबतच थायरॉइड फंक्शन टेस्ट तसेच थायरॉइड स्कॅन किंवा अल्ट्रा साउंड करून करतात.
हायपर-थायरॉइडिझम ्‌वर उपचार
आयुर्वेदामध्ये ह्यावर सारिवा, शतावरी, जेष्टमाध, दशमूळ, अश्वगंधा, ब्राम्ही , उशीर ह्यांचा चांगला उपयोग होतो. तसेच अन्य कल्प जे वैद्य रुग्णाची व रोगाची अवस्था पाहून वापरतात ते आहे चंद्रकला रस, प्रवाळ पिष्टी, ब्राम्ही वटी इ. औषधी तूपांमध्ये शतावरी, ब्राम्ही ही घृते उपयुक्त ठरतात.

पंचकर्म उपचारात नाकात तेल टाकणे अर्थात नस्य तेसुद्धा क्षीरबला तेल किंवा अन्य सिद्ध तुपाचा उपयोग केला जातो.
शिरोधारेचा सुद्धा खूप फायदा होतो
बरेचदा जर उपचार प्रभावी ठरत नसतील तर डॉक्टर थायरॉइड ग्रंथी शस्त्रक्रियेद्वारे करून काढून सुद्धा टाकू शकतात.
या आजारात रुग्णाने घ्यावयाची काळजी

  • आहारात आयोडिनयुक्त मीठ न वापरता समुद्री मीठ किंवा सैंधव मीठ वापरावे.
  • आहारात सी फूड कमी घ्यावे. दूध व दुधाचे पदार्थ, चीज, खाण्याचे रंग, अंड्याचा बलक खाऊ नये.
  • ब्रोकोली, कोबी, हिरव्या पालेभाज्या, पालक ह्यांचा समावेश आहारात करावा.
  • आहारात लोह,कॅल्शियम, सेलेनियम, झिंक, विटामिन-डी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

औषध- आहार- विहार ह्यासोबत व्यायामसुद्धा तेवढाच आवश्यक आहे व्यायामात धावणे, जॉगिंग वगळून चालणे, स्पाइन वॉक, सायकल चालवणे, पोहणे, वॉटर एरोबिक्स असे व्यायाम करावे. तसेच जड व्यायाम न करता मध्यम प्रमाणात व्यायाम करावा.
स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगमध्ये शरीरवजनाचे ट्रेनिंग, डंबेल्स, उठाबशा, दंडबैठका इ.चा अंतर्भाव आपल्या व्यायामात करावा.
तसेच शरीर संतुलन व संचालनाचे व्यायामसुद्धा उपयुक्त ठरतात.
योगासनांचा ह्यात खूप फायदा होतो- उष्ट्रासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, मत्स्यासन, सर्वांगासन, भुजंगासन, शीर्षासन ह्यांचा नियमित अभ्यास करावा.
प्राणायामात शितली प्राणायाम, सित्कारी प्राणायाम, भा्रमरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम प्रभावी आहेत. तसेच ध्यानही ह्या आजारात प्रभावी ठरते.
थोडक्यात योग्य आहारविहार, औषध, व्यायाम, योग, प्राणायाम ह्यांच्या एकत्रित अभ्यासाने हायपर-थायरॉइडिझम बरा होतो.