हवेतील प्रदूषणाचे अदृश्य संकट

0
242
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

आपल्या देशातील नेते अशा विषयांवर जास्त चर्चा करून आपला किंमती वेळ वाया घालवतात, ज्याचा देशवासियांच्या सुरक्षित जीवनाशी काहीही संबंध नाही. वास्तविक हा एक गंभीर मुद्दा आहे. यावर हल्लीच संसदेत चर्चा झाली. मात्र त्यात सहभागी होण्यात अनेक सर्वपक्षीय खासदारांनी टाळले. यातच त्यांना याबद्दल किती गांभीर्य आहे हे लक्षात येते.

जमीन, हवा आणि पाणी या तीन घटकांवर सजीव प्राण्यांचे अस्तित्व टिकून आहे आणि सध्या या घटकांना प्रदूषणाच्या राक्षसाने ग्रासले असल्याने सर्वांचे जीवन धोक्यात आले आहे. पृथ्वीच्या वातावरणात असलेला प्राणवायू हे तिला लाभलेले संरक्षण कवच आहे, कारण त्यामुळे इथे वनस्पती आणि प्राणी या सजीवांचे अस्तित्व आहे. पृथ्वीव्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रहावर प्राणवायू नसल्याने तिथे सजिवांचे अस्तित्व नाही. एखाद्यावेळी पृथ्वीवरचा हा सजीव प्राणी अन्नावाचून काही दिवस जिवंत राहू शकतो, पाण्यावाचून काही तास तग धरू शकतो, मात्र हवा नसेल तर काही सेकंदांत श्‍वास कोंडून घुसमटून प्राण सोडेल. हवेत वायुंसोबत धूळ, धातुचे कण, सुक्ष्म जिवाणू, विषाणू असतात. यांचे प्रमाण जास्त झाले तर हवेत प्रदूषण होते. माणसाची श्‍वास घेण्याची प्रक्रिया जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत येऊन थांबते. श्‍वास घेण्याचा अधिकार सर्व जाती, धर्म, पंथ सर्वांनाच भेदभाव न करता मिळत असतो. वायुप्रदूषण हे शरीराला हानी पोहोचवू शकते. या प्रदूषण नामक घातक राक्षसाचा विळखा सार्‍या जगात चिंतेचा विषय बनला आहे.

पृथ्वीवर महापूर, जंगलातले वणवे, भूकंप सारख्या होणार्‍या नैसर्गिक आपत्तीत अनेकदा पर्यावरणाचे प्रदूषण होते, तसेच १९ व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. या काळात अनेक यंत्रांचा शोध लागला. तसेच उपभोगाची साधनेही वाढली. तेव्हापासून मानवाने पर्यावरणाची हानी करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत विकास झाला, त्यात कारखान्यांची झालेली वाढ, दळणवळणात झालेली अविश्‍वसनीय सुधारणा ही निसर्गावर कुरघोडी करून मानवाने केली आहे. विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन यात संतुलन न राखल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. आधी घरात गृहिणी या गोवर्‍या, लाकडे, चूल पेटवण्यासाठी वापरत असत. तेव्हा होणारा धूर लगेच विरूनही जात असल्यामुळे प्रदूषणाला वाव नसायचा. मात्र कारखान्यांच्या धुराड्यातून, वाहनांच्या धुरातून येणार्‍या हवेत घातक वायू सोडला जातो. त्याचे परिणाम दूरच्या गावांनाही भोगावे लागतात. मनुष्याचे जे मूलभूत अधिकार आहेत, त्यात ‘स्वच्छ हवा मिळणे’ हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपण श्‍वास घेण्याच्या स्वरुपात जे वायुकण शरीरात घेतो, त्यात मृत्यूला कारणीभूत ठरणारे वायूकण असतात. यांची आपल्याला मुळीच जाणीव नसते. आपले पूर्ण शरीर प्रदूषणरुपी राक्षसाच्या विळख्याने घेरले आहे.

सध्या दिल्ली शहराचे नाव या हवा प्रदूषणाच्या घातक परिणामांसाठी गाजत आहे. दिल्ली हे केवळ एका शहराचे नाव नाही. ती देशाची राजधानी असल्यामुळे देशाचा प्राण आहे. मात्र आज हेच शहर हवा प्रदूषणाने इतके ग्रासले आहे की स्थानिकांचा प्राण घेऊ शकते. दिल्ली आणि आसपासच्या शहरात सध्या सूर्य डोके वर काढण्यास धजत नाही. आपला जीव वाचवण्यासाठी येथील स्थानिक एका एका श्‍वासापर्यंत लढाई करीत आहेत. सध्या तोंडाला मास्क बांधून फिरणे अनिवार्य बनले आहे. जणू मास्क आता इथल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. श्‍वसनांचा रोग, त्वचारोग, हृदयविकार, मानसिक विकार हे हवा प्रदूषणाच्या माध्यमातून स्थानिकांना सतावत आहेत. नोव्हेंबर महिन्यात इथे हवा प्रदूषणाने इतका कहर केला की ५-६ दिवस शाळेला सुट्टी देण्यात आली. वास्तविक उत्तर भारतातील बहुतेक राज्ये हवा प्रदूषणाची शिकार आहेत. हरियाणातील पानिपत शहर हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर मानले जाते. दुसरा नंबर हरियाणातील केथला या शहराचा आहे. तिसर्‍या नंबरवर दिल्लीचा द्वारका हा भाग आहे. चौथा नंबर हा नोयडा शहराचा आहे. जगात जी ३० प्रदूषित शहरे आहेत, त्यात भारतातील २२ शहरांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी हवा प्रदूषणाने होणार्‍या रोगाने १२ लाख लोकांचा मृत्यू होतो. आज शहरातील प्रत्येक व्यक्ती अप्रत्यक्षपणे धूम्र्रपान करीत आहेत, कारण हवा प्रदूषणावर नजर ठेवणार्‍या संस्थेच्या मते एखादा व्यक्ती जेव्हा प्रदूषित हवा श्‍वासाद्वारे आत घेते, तेव्हा त्या हवेतील घातक प्रमाण हे ३-४ सिगरेटी ओढण्यासारखेच असते. त्यामुळे जी व्यक्ती दारू पित नाही किंवा धूम्रपान करीत नाही अथवा इतर व्यसने करीत नाही, तिलाही घातक रोगांनी ग्रासले जाते. याचे प्रमुख कारण हे हवा प्रदूषण, जल प्रदूषण हे आहे.

१९४५ साली दुसर्‍या महायुद्धाच्या निर्णायक पर्वात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून ती उद्ध्वस्त केली गेली. प्रत्येक अणुबॉम्बच्या आणि इतर बॉम्बच्या चाचणीनंतर पृथ्वीच्या वातावरणात भयंकर उष्णता निर्माण होते आणि हजारो टन अणुभरित धूळ आणि राख हवेत मिसळते. तेव्हा वार्‍याच्या प्रवाहाबरोबर ती दूरपर्यंत वाहून नेली जाते. आज अनेक कारखाने घातक बनले आहेत. भोपाळ येथे युनियन कार्बाईड ही अमेरिकन कंपनी होती. या कारखान्यात अनेकदा किरकोळ वायुगळती होत होती. मात्र त्याची कधी वाच्यता झाली नाही. जेव्हा ३ डिसेंबर १९८४ रोजी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली, तेव्हा याचे घातक परिणाम दिसू लागले. न भूतो न भविष्यती अशी अपरिमित जीवितहानी झाली. हजारो अपंग झाले. अनेकांची दृष्टी गेली. कंपनीचे अधिकारी सहिसलामत देशातून पळून गेले. गुन्हेगारांना शिक्षा झालीच नाही. स्थानिकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. प्रदूषणाच्या कारणास्तव अनेक कारखाने न्यायालयाच्या आदेशाने बंद पाडले आहेत, तरीही काही बड्या लोकांचे कारखाने भ्रष्ट कारभाराच्या कृपेने राजरोज चालू आहेत. एका बाजूला शासन छोट्या व्यवसायिकांची अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी छळवणूक करीत असते, तर दुसर्‍या बाजूला बड्या उद्योगांना कोणतीही शहानिशा न करता ना हरकत दाखला देत आहे. यात केवळ आर्थिक फायदा पाहिला जातो. जनतेच्या सुरक्षिततेला काडीचीही किंमत नाही.

औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून विकासाची दारे खुली झाली. मात्र त्यासाठी निसर्गावर कुर्‍हाड उभारण्यात आली. सतत होणारी वृक्षतोड यामुळे जंगले नष्ट झाली. वृक्ष हे वातानुकूलन करणार्‍या यंत्रापेक्षा जास्त गारवा देतात. तसेच हवा आणि इतर प्रदूषणाचा वृक्षांवर घातक परिणाम होतो. वृक्ष हे हवा शुद्धिकरणाचे नैसर्गिक साधन असले तरी आज प्रदृषणाची अधिक मात्रा वृक्षांसह अनेक नैसर्गिक घटकांवर भारी पडत आहे. वाहनांतील धूर आणि धुळीचा वृक्षांमुळे अटकाव होतो. त्यामुळे वृक्षांची लागवड आणि संवर्धन आवश्यक आहे. आपण सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. अशा तर्‍हेचा प्रदूषणकारी मार्ग पत्करला तर हेच सण-उत्सव साजरे करण्यासाठी जिवंत राहू ही शक्यता कमी आहे. प्रदूषणाच्या माध्यमातून मृत्यू वेळेआधी आपल्या घराचे दरवाजे ठोठावत आहे. आपल्या देशातील नेते अशा विषयांवर जास्त चर्चा करून आपला किंमती वेळ वाया घालवतात, ज्याचा देशवासियांच्या सुरक्षित जीवनाशी काहीही संबंध नाही. वास्तविक हा एक गंभीर मुद्दा आहे. यावर हल्लीच संसदेत चर्चा झाली. मात्र त्यात सहभागी होण्यात अनेक सर्वपक्षीय खासदारांनी टाळले. यातच त्यांना याबद्दल किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. अशाने भारत कधी प्रदूषणमुक्त होणार ही चिंता सामान्यांना सतावत आहे, कारण हे संकट अदृश्य स्वरुपातील असल्याने भविष्यात त्याचे भीषण फटके बसणार आहेत.