ह्या एकाच महिन्यात पाच दहशतवाद्यांनी हल्ल्यांनी जम्मू काश्मीर हादरून गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा सत्तारूढ झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून, अगदी शपथविधी सोहळा होत असतानाच जम्मूमध्ये पहिला हल्ला रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर झाला आणि तेव्हापासून सतत दहशतवादी हल्ले सुरू आहेत. पुलवामानंतर बालाकोटच्या कारवाईने जो धाक पाकिस्तानला निर्माण केला होता, त्याचा असर ओसरल्याचेच हे निदर्शक आहे. काश्मीर खोऱ्याऐवजी आता जम्मू विभागाला लक्ष्य केले जात आहे असे दिसते. ह्याची कारणे मुख्यतः दोन आहेत. पहिली बाब म्हणजे जम्मू हा बहुतांशी हिंदुबहुल भाग आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तो सगळा डोंगराळ परिसर असल्यामुळे घनदाट अरण्ये आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या त्या भागामध्ये दहशतवादी हल्ले चढवणे तुलनेने सोपे आहे. शिवाय पाकिस्तानमधून घुसखोरीचे नवे मार्ग ह्या परिसरांत निर्माण झाले असण्याचीही दाट शक्यता आहे. 2021 साली ऑक्टोबर महिन्यात जम्मूमध्ये पहिला मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. जवळजवळ दहा दिवस ती चकमक सुरू होती. त्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूमध्ये लष्करी वाहनेच नव्हेत, तर अगदी आम नागरिकांनाही लक्ष्य केले जात आले आहे. सध्या दहशतवाद शिगेला पोहोचला आहे, त्यामागे काही ठळक कारणे आहेत. एक म्हणजे काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या दिशेने सरकार पावले टाकू लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहशतवाद्यांना न जुमानता नागरिकांनी मतदानप्रक्रियेत भाग घेतला, त्यामुळे दहशतवादी चवताळलेले आहेत. त्यातच मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण करून काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेऊन लोकशाही बहाल करण्याच्या दिशेने सरकार योजनाबद्ध पावले टाकत असल्याने तो बेत हाणून पाडण्यासाठीच जम्मू काश्मीर पेटवले जात आहे. तिसरे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे सध्याची अमरनाथ यात्रा. काश्मीरमध्ये दहशतवाद कितीही शिगेला पोहोचला, यात्रेकरूंवर कितीही भीषण व प्राणघातक हल्ले झाले, तरीही भाविकांच्या मनोबलावर त्याचा यत्किंचितही परिणाम होत नाही व दुप्पट उत्साहात भोलेबाबाचा जयकारा करीत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक अमरनाथ गुंफेच्या दिशेने निघत असतात हेच आजवर दिसून आले आहे. त्यामुळे आतादेखील या यात्रेच्या तोंडावर दहशतवादी हल्ले होऊनही त्या दहशतीखाली न येता अमरनाथ यात्रेला यात्रेकरू निघालेले आहेत. काश्मीरचे विशेषाधिकार हटवल्यापासून तेथे निर्माण होत असलेली शांती व प्रगती दहशतवाद्यांच्या डोळ्यांत खूपणे स्वाभाविक आहे. दहशतवादाचा निःपात करण्यासाठी केंद्र सरकारने एनआयएच्या माध्यमातून मोठी मोहीम राबवली. मुख्य म्हणजे दहशतवादाचा आर्थिक कणाच दिल्लीपासून काश्मीरपर्यंत कमकुवत केला. त्यामुळे काहीही करून आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी दहशतवादी शक्तींना आणि त्यांच्या पाकिस्तानस्थित पाठीराख्यांना पावले उचलणे भाग पडले आहे. त्यामुळे आता अधिक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह त्यांना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे शिंपण्यासाठी पाठवले जात आले आहे. आपल्याकडे अस्तनीतल्या निखाऱ्यांची कधीच कमी नसते. त्यामुळे ह्या दहशतवाद्यांना स्थानिक पाठबळही सतत मिळत आले आहे. सध्याचा हिंसाचार घडवण्यामागे जहांगीर सरूरी हा कुख्यात दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा हा सरूरी 1992 पासून भूमिगत आहे. त्याने आपले जाळे निर्माण केले आहे. पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करण्यासाठी राजौरी, पूँछ आणि सांबा, हीरानगर भागातून घुसखोरीचे नवनवे मार्ग शोधून काढले जात असतात. त्यासाठी दहशतवाद्यांनी भुयारे खोदली आहेत. आता देखील सीमेपलीकडे साठ ते सत्तर दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची खबर आपल्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. जम्मू विभागात दऱ्याखोऱ्या, खराब, वळणदार रस्ते आहेत. त्याचा फायदा घेत वळणावर वाहनांची गती कमी झाली की हल्ले चढवले जात आहेत. परवा लष्कराच्या ट्रकवर दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी बेफाम गोळीबार केला. चिलखती वाहने भेदून जाणाऱ्या पोलादी गोळ्या दहशतवादी वापरत आहेत. जम्मू काश्मीरमधील नव्याने उसळलेल्या दहशतवादाचे हे पाणी आता गळ्याशी आले आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तारूढ झाले आहे खरे, परंतु हे आघाडी सरकार असल्याने कमकुवत असल्याची जर पाकिस्तानची भावना बनलेली असेल, तर ती खोटी असल्याचे भारत सरकारला दहशतवादाविरुद्धच्या आपल्या धडक कारवाईने पुन्हा एकवार दाखवून द्यावेच लागेल!