हक्कभंगाच्या वादावर सामोपचाराने पडदा

0
9

>> विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाईंची यशस्वी शिष्टाई; प्रश्नोत्तराचा तास मात्र गेला वाया

हक्कभंगाचा मुद्दा काल पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापती रमेश तवडकर यांची माफी मागावी, या मागणीवरून काल गोवा विधानसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. परिणामी दुसऱ्या दिवशी देखील प्रश्नोत्तराच्या तासाला एकाही तारांकित प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. यानंतर शून्य प्रहराला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सभापती रमेश तवडकर यांच्याशी केलेल्या शिष्टाईनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटवले.

काल प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परत एकदा सभापतींच्या हक्काभंगाचा प्रश्न उपस्थित करून एल्टन डिकॉस्टा यांनी त्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, त्यावर उत्तर देताना, डिकॉस्टा यांनी परत एकदा आपण सभापतींचा अपमान होईल असे काहीही बोललेलो नसून, या एकूण प्रकरणाचा उगीच बाऊ केला जात असल्याचा आरोप केला. ते पुढे आपले स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत असतानाच सर्व सत्ताधारी आमदारांनी उभे राहून एकाच वेळी गदारोळ माजवला.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे म्हणाले की, एकदा सत्ताधारी पक्षाच्याच एका मंत्र्याने सभापतींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी तुम्ही गप्प कसे राहिलात. त्यावर उत्तर देताना, कोणत्याही मंत्र्याने सभापतींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी एल्टन डिकॉस्टा यांनी आपण हक्कभंग केलेला असेल, तर प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपवा, अशी मागणी केली. हक्कभंग समितीच्या अध्यक्षांकडे मग मी माझी बाजू मांडेन, असे ते म्हणाले. त्यावर सभागृह हेच सर्वोच्च असल्याचा मुख्यमंत्र्यांनी दावा केला.
यावेळी हस्तक्षेप करताना सभापती रमेश तवडकर हे एल्टन डिकॉस्टा यांना उद्देशून म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार काम करतो, असा आरोप तुम्ही पत्रकार परिषदेतून केला होता.

यावेळी हस्तक्षेप करताना आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सरकारला आजही प्रश्नोत्तराचा तास बंद पाडायचा आहे आणि त्यासाठीच हे सगळे काही केले जात आहे. सभापतींनी हे प्रकरण तोडगा काढण्यासाठी हक्कभंग समितीकडे सोपवावे.
यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्यानंतर सभापतींनी 11.45 वाजता सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले.
12 वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती रमेश तवडकर म्हणाले, ही रमेश तवडकर या व्यक्तीची नव्हे, तर सभापतींची मानहानी आहे. त्यामुळे सदस्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून माफी मागणे हेच योग्य ठरेल. मात्र, यावेळी उत्तर देताना एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींविषयी आपणाला आदर असून आपण त्यांना काहीही चुकीचे म्हटलेले नाही. मात्र, तरीही सभापतींना आपण हक्कभंग केलेला आहे असे वाटत असल्यास प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवावे अशी सूचना केली.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, विधानसभा अधिवेशन सुरू व्हायच्या पार्श्वभूमीवर किंवा अधिवेशन संपल्यानंतर सभापती, तसेच सभागृहातील सदस्यांविषयी कुणीही आक्षेपार्ह विधाने करू शकत नाहीत. यावेळी विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमकी झडल्यानंतर सभापतींनी 12.15 वाजता परत एकदा सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज 12.30 वाजता सुरू झाल्यानंतर युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांनी केलेल्या शि ष्टाईनंतर हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले.

यावेळी युरी आलेमाव यांनी शिष्टाई करताना एल्टन डिकॉस्टा यांनी आपली बाजू मांडताना सभापतीपदाविषयी आपणाला आदर असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे सरकारने हे प्रकरण आणखी चिघळू देऊ नये, अशी सूचना केली.

एल्टन यांनी आणलेला खासगी ठराव हा एसटींच्या भल्यासाठी होता आणि सभापती रमेश तवडकर हे तर खुद्द एक एसटी नेते असून त्यांनीही एसटींच्या भल्यासाठी काम केलेले आहे. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात यावे. प्रश्नोत्तराचा तास दोन दिवस वाया गेला हे वाईट झाल्याचे विजयी सरदेसाई यांनी नमूद केले. त्यामुळे शेवटी हे हक्कभंगाचे प्रकरण सत्ताधारी व विरोधक यांनी सामोपचाराने मिटवले.

हक्कभंगाचा ठराव मांडलाच नव्हता : मुख्यमंत्री

यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला प्रश्नोत्तराचा तास बंद पाडायचा नाही. काल विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातल्याने आमदार दाजी साळकर यांना एल्टन डिकॉस्टा यांच्याविरुद्ध सभागृहात हक्कभंगाचा ठराव मांडताच आला नव्हता. ठराव मांडलेलाच नसताना प्रकरण हक्कभंग समितीकडे कसे सोपवता येईल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर हस्तक्षेप करताना, ठराव मांडण्यात आला होता, असे विजय सरदेसाई म्हणाले.

अन्यथा माफीनाम्याची वाईट प्रथा सुरू होईल

विजय सरदेसाई यांनी सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एकेकदा आपण जे काही बोलतो, त्याचा वेगळाच अर्थ काढला जातो. पण विधान करणाऱ्या माणसाचा हेतू हा कुणाचा अपमान करण्याचा असतोच असे नाही. आता डिकॉस्टा यांनी जर या प्रकरणी माफी मागितली तर उद्या अन्य सदस्यही कुणी तरी आपल्याविषयी आक्षेपार्ह विधान केलेले असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी करू लागतील आणि मग सदस्यांनी माफी मागण्याची एक वाईट प्रथा सुरू होईल, असे सरदेसाई म्हणाले.