‘हंपी’ ः ऐतिहासिक स्मारकांचा वारसा

0
409
  • पुंडलिक विश्वनाथ पंडित
    (एल. डी. सामंत मेमोरियल विद्यालय, पर्वरी -गोवा.)

कित्येक दिवस विजयनगरचे हे विखुरलेले अवशेष पाहण्यासाठी हंपी गाठावं असं डोक्यात होतं, आणि यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मित्रांसोबत या स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली. येथील हंपीचं वास्तुवैभव व स्थापत्त्यरचना पाहत असतानाच मनात एक विचार आला की, या भव्य अशा पुरातन वास्तूंचे दर्शन माझ्या विद्यार्थ्यांना करून दिलेच पाहिजे.

राजाधिराज वीरप्रतापी श्री. कृष्णदेवराय राजाची विजयनगर ही तुंगभद्रा नदीकाठावरील नगरी. दक्षिण भारतातले शिवकाळापूर्वीचे शेवटचे हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवरायाचा काळ म्हणजे विजयनगरचा सुवर्णकाळ. कित्येक दिवस विजयनगरचे हे विखुरलेले अवशेष पाहण्यासाठी हंपी गाठावं असं डोक्यात होतं, आणि यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मित्रांसोबत या स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली. येथील हंपीचं वास्तुवैभव व स्थापत्त्यरचना पाहत असतानाच मनात एक विचार आला की, या भव्य अशा पुरातन वास्तूंचे दर्शन माझ्या विद्यार्थ्यांना करून दिलेच पाहिजे. म्हणून वेळ न दवडता माझे सहकारी शिक्षक अमेय बेतकेकर व मी दोघांनी मिळून विद्यालयाची एक शैक्षणिक सहल हंपी-हॉस्पेटला नेण्याचा प्रस्ताव आमच्या मुख्याध्यापकांसमोर ठेवला. त्यांनीही लगेच आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली. रेल्वेची तिकिटे व तेथे राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था करून ३० विद्यार्थी व आम्ही १५ शिक्षक असा ४५ जणांच्या एल. डी. सामंत विद्यालयाच्या चमूने नाताळाच्या सुट्टीत तीन दिवसांचा हंपी- हॉस्पेट दौरा निश्चित केला

दिवस पहिला
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी भल्या पहाटे थंड अशा वातावरणात मडगाव स्थानक गाठले व अमरावती- हावडा एक्स्प्रेसने प्रवास सुरू झाला. दुपारी ३ च्या दरम्यान हॉस्पेटला पोहोचलो. बसवाला ’शिवा’ आमची वाट पाहतच होता. सर्व सामान बसमध्ये भरून आम्ही हॉटेलवर न जाता सरळ तुंगभद्रा धरणावर निघालो. तेथील गार्डन व प्राणी संग्रहालयातील हरिणं, ससे, मोर पाहत पाहत बाजूला असलेले मत्स्यालय पाहून वर धरणावर आलो. पाण्याने भरलेला तलाव आहे की समुद्रच आहे असा आभास निर्माण करणारे हे १९५३ साली बांधण्यात आलेले तुंगभद्रा नदीवरील धरण. खाली हिरवेगार मैदान. अशा पार्श्वभूमीवर मावळत्या सूर्यासोबत स्वतःला कॅमेर्‍यात कैद करत हॉस्पेटमधील हॉटेलवर पोहोचलो. रात्री थंडीचा तडाखा मात्र अंदाजापेक्षा थोडा जास्तच जाणवला.

दिवस दुसरा
सकाळी पाचला उठून, अंघोळ करून हॉटेलमध्ये नाश्ता केला व बसने हंपीला जायला निघालो. हॉस्पेट ते हंपी हे १३-१४ किलोमीटर अंतर कापताना परिसराने हळूहळू रंग पालटायला सुरुवात केली होती. तांबूस, तपकिरी, काळ्या रंगांचे अवाढव्य
खडक व त्यांचे एकावर एक रचलेले प्रचंड नैसर्गिक ढीग दिसायला लागले. मुसलमान आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी व त्यात लाखो वर्षांची ऊन-पावसाच्या मार्‍याने झालेली धूप त्यामुळे हे सारे खडक उघडे पडले होते. एकावर एक अस्ताव्यस्त रचल्यागत काळ्या रंगाची विविध आकृतिबंध असलेली मंदिरे व वास्तू आपले लक्ष वेधून घेत होती. खडकांचा काळसर रंग व मोहक आकृतिबंध यांमुळे परिसराचा नूर पालटला होता.

त्यात थंडीची झुळूक मनाला उल्हसित करीत होती. ‘हंपी’ जवळ येत असल्याची ती खूणगाठ होती. हंपीमध्ये प्रवेश करून बसमधून उतरताच सर्वांनी आपापले कॅमेरे बाहेर काढून अधाशासारखे फोटो काढायला सुरुवात केली. हंपी हे गाव पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र किंवा भास्कर क्षेत्र या नावाने पण ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे एक जुने नाव आहे. त्यावरूनच याला हंपी असे नाव पडले. यालाच विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते. हेमकूट टेकडीवरील गणपतीचे दर्शन करून हंपी दर्शनाचा श्रीगणेश़ा केला. टेकडीवर अनेक मंदिरे आणि बोल्डर पसरले आहेत. टेकडी उतरू लागलो तो खाली विरुपक्ष मंदिराचा कळस चमकू लागला. तेथील विरुपाक्ष मंदिर हे एकमेव मंदिर जिथे अजून पूजाअर्चा होते. इतर मंदिरांत देवता नाहीत.

विरुपाक्ष मंदिर पाहून झाल्यावर मंदिरासमोरील ठेल्यावर, शहाळी व आईस्क्रीम इत्यादींवर
ताव मारला. कारण सूर्यदेवाने आपली ऊष्णतेची तीव्रता हळूहळू वाढवायला सुरुवात केली होती. हंपी बाजारातून नंदी पाहिला. पुढे पुरातन कृष्ण मंदिर, हिरा बाजार, उग्र नरसिंह, पाण्यात असलेले भव्य शिवलिंग, नंतर राजपरिवार संबंधित जागा पहिल्या. डिब्बा, पुष्करणी, हजार रामा मंदिर व शेजारील कृष्णदेवरायाचा वाडा पाहून शेवटी लोटस् महाल, हत्ती शाळा पाहत कमलापूरला येऊन भोजन केले. तेथील ए.एस.आय. वस्तूसंग्रहालय पाहिले. तेथेच थोडा वेळ विश्रांती घेऊन इथून सरळ विठ्ठल
मंदिर गाठले.

विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे ते इथल्या रथामुळे. विशेष म्हणजे या पुरातन वास्तू परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. पण सायकली व बॅटरीवरील खास वेगळी वाहने इथे सरकारनेच वापरात आणली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या बॅटरीवर चालणारी वाहने येथील स्थानिक मुलीच चालवताना दिसतात. बॅटरी कारसफारीचा आनंद लूटत मंदिर परिसरात दोन तास कसे गेले याचे भानच उरले नाही. असा सूर्योदय ते सूर्यास्त आम्ही हंपीत काढला व परत हॉटेल गाठले.
दिवस तिसरा

काल हंपीची एक बाजू पाहून झाल्यावर आज तुंगभद्रा नदीच्या पलीकडील किष्किंदाला भेट द्यायला निघालो. वाल्मीकी रामायणात हा प्रदेश प्रथम वाली व त्यानंतर सुग्रीवाचे राज्य असल्याची नोंद आहे. येथील प्रसिद्ध अंजनेंद्री पर्वतावरील अंजनीपुत्र श्री हनुमंताच्या जन्मस्थानापर्यंत पोचायला ५५० पायर्‍या चढायची मानसिक तयारी केली व ‘जय श्रीराम’ ‘बजरंग बली की जय’च्या घोषात पर्वत चढायला सुरुवात केली. काही उत्साही विद्यार्थ्यांनी तर जवळ जवळ धावतच हे अंतर पार केले. पण आमच्यासोबत असलेल्या आमच्या ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांचा उत्साह मात्र वाखाणण्यासारखा होता. त्यांनीही उमेदीने पर्वत चढून मारुतीरायाचे दर्शन घेतले. एवढ्या ऊंचीवरून संपूर्ण हंपीचे विहंगम दृश्य पाहताना मन कसे प्रफुल्लित झाले. सोबत कॅमेर्‍याची साथ होतीच. खाली उतरून पंपा सरोवर पाहिले व पेटपूजा करण्यासाठी किष्कींधा रिसोर्टवर पोहोचलो.

सकाळपासूनचा सर्व शीण, थकवा दूर करण्यासाठी पूर्ण सायंकाळ येथील वॉटर पार्कमध्ये मनसोक्त डुंबलो व वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताला निरोप देत नको ती दृश्यं मागे सोडीत व येथील कारागिरी, हंपीचं वैभव व सौंदर्य, विदेशी पर्यटकांची उत्सुकता, शाळकरी मुलांचे हलणारे हात अशा दृश्यांची उजळणी करीत हंपीचा निरोप घेतला.