स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार

0
3

>> प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जलमार्ग प्राधिकरणाकडून कंपनीची नियुक्ती

स्वारगेट एसटी बसस्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना काल उघडकीस आली. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. या घटनेने पुणे हादरले असून, नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलीस शोध घेत आहेत. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल आहे. त्यामध्ये ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटे सांगून बसमध्ये नेले आणि अत्याचार केला. यावेळी नेमके काय काय घडले, त्याची माहिती देखील समोर आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकात आली. तिला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून दत्तात्रयने तिला आगारात मधोमध उभी असलेली एसटी फलटणला जाणार आहे, असे सांगितले. ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून, वाटेत ती फलटणला थांबेल, असे त्याने पीडितेला सांगितले. हे सगळे सांगताना तो पीडितेला ताई – ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तिच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि नंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामुळे घाबरुन जाऊन ही तरुणी तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगू शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तिने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने स्वारगेट बसस्थानकातील 23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन केले. नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या परिवहनमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. याशिवाय स्वारगेट आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.