स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची सरकारी नोकरीसाठी निदर्शने

0
26

>> नियुक्तिपत्रे न मिळाल्यास तीव्र आंदोलन

सरकारी नोकरीपासून वंचित असलेल्या राज्यातील स्वातंत्रसैनिकांच्या मुलांनी सरकारी नोकरीच्या मागणीसाठी येथील आझाद मैदानावर सोमवारी निदर्शने केली. नोव्हेंबर अखेरपर्यंत नियुक्तिपत्रे न मिळाल्यास १ डिसेंबरपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

राज्य सरकारने एकूण १०० जणांना नियुक्तिपत्र देण्याचे आश्‍वासन दिले होते. तथापि, अद्यापपर्यंत त्यातील एकालाही नियुक्तिपत्र मिळालेले नाही. नोव्हेंबरअखेरपर्यंत ही नियुक्तिपत्रे द्यावीत; अन्यथा १ डिसेंबरपासून आझाद मैदानावर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तत्पूर्वी, दि. २६ नोव्हेंबरला आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणारे आंदोलन केले जाणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. दोन महिन्यापूर्वी सुमारे १०० मुलांना नोकरीची नियुक्तिपत्रे देण्याचे एका बैठकीत निश्‍चित करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्या टप्प्यात ६० जणांना आणि दुसर्‍या टप्प्यात ४० जणांना नियुक्तिपत्रे देण्याचे आश्‍वासन दिले. ही नियुक्तिपत्रे अद्यापपर्यंत का देण्यात आलेली नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी डॉ. शेट यांनी केली.