स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांचे उचित स्मारक व्हाव

0
272
  • गुरूनाथ पै

गोव्याच्या मुक्तिलढ्यामध्ये आपले ओजस्वी योगदान देणारे स्व. मोहन रानडे यांची आज ९० वी जयंती. रानडे यांचे गोव्यामध्ये एखादे उचित स्मारक उभारून त्यांच्याप्रतीची कृतज्ञता आपण व्यक्त करायला हवी..

पोर्तुगिजांच्या दास्यातून गोमंतकाची मुक्तता करण्यासाठी १८ जून १९४६ रोजी क्रांतीची मशाल डॉ. राममनोहर लोहिया यांनी प्रज्वलित केली. त्या मशालीच्या ज्वालेने पोर्तुगिजांचे गोव्यातील प्रशासन हादरून गेले. ‘जयहिंद आंदोलना’ कडे ते सूडभावनेने पाहू लागले व सर्वत्र धरपकडीचे सत्र त्यांनी आरंभिले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमाता मुक्त झाली, परंतु पोर्तुगिजांच्या दास्यातून गोवा, दमण व दीव, दादरा आणि नगरहवेली हे प्रदेश मुक्त झाले नव्हते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवाही पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या जोखडातून मुक्त व्हावा अशा आकांक्षेने त्या काळात (१९४७ ते १९५४) मुंबई, पुणे, बेळगाव आदी शहरांतील काही युवकांना अक्षरशः झपाटले होते. या युवकांवर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची छाप पडली होती. अशा या युवकांपैकी एक ध्येयवादी तरुण होता मनोहर आपटे ऊर्फ मोहन रानडे.

गोवा मुक्तीसाठी अहोरात्र तळमळणारा मूळचा सांगली येथील हा तरुण पुण्यात स्थायिक झालेला, स्वातंत्र्यदेवीचा पुजारी! तिला प्रसन्न करण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रसंगी प्राणांचीही आहुती देण्यासाठी जणू त्याने जन्म घेतला होता. १९५० च्या दशकात गोव्यात स्वातंत्र्य चळवळ मंदावली होती व पोर्तुगीज पोलीस ठिकठिकाणी ‘जयहिंद’वाले म्हणून स्वातंत्र्यसैनिकांना पकडून अनन्वित छळ करीत होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पोर्तुगीज सरकारचा गोव्यातील हस्तक आजेंत मोंतेरोने अक्षरशः उच्छाद मांडला होता. अशा काळात अवघ्या विशीतला मनोहर आपटे आपले नाव बदलून शिक्षक बनून गोव्यात आला. मुलांना धूळपाटीवर मुलांना श्रीगणेशा गिरवायला शिकवता शिकवता त्यांच्या पालकांना स्वातंत्र्याविषयी जागृत करू लागला. रानडे यांनी आपल्याला या कामी मदत करण्यासाठी आपला मित्र श्रीपाद साठे यांची निवड केली. दोघेही गोव्यात भूमीगत कार्य करू लागले. पालक व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना रुजवू लागले.

अन्यायाविरुद्ध मोहन रानडे यांना अतिशय चीड! त्यामुळे कुठेही अन्याय झाला असे दिसल्यास ते पेटून उठत. सावईवेरे येथे मुलांना शिकवत असता तेथील पोलीस पाटलाने (रेजिदोर) स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध पोर्तुगीज राज्यकर्त्यांकडे चहाडी केली, त्यानंतर अनेक निरपराध नागरिकांची पोर्तुगिज पोलिसांनी धरपकड केली व त्यांच्यावर अत्याचार केले. मोहन रानडेंना रेजिदोरचा राग आला. त्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यसैनिकांनी या अन्यायाचा बदला घेतला व त्या रेजिदोरला आपला प्राण गमवावा लागला.

मोहन रानडे त्यानंतर भूमीगत झाले. त्यांनी सावई गाव सोडला व भूमीगत अवस्थेत ते गोव्यात सर्वत्र संचार करून स्वातंत्र्यसैनिकांचे एक पथक निर्माण करण्याच्या कामी गुंतले. त्यांनी शस्त्रे गोळा करण्याच्या निर्धाराने अस्नोडा व बाणस्तारी पोलीस चौक्यांवर हल्ले करून पोर्तुगिजांची झोप उडवली. आपल्या पथकात त्यांनी बाळा मापारी, बाळकृष्ण भोसले, मनोहर पेडणेकर अशा निधड्या छातीच्या तरुणांना भरती केले व गोव्यातील पोर्तुगीज शासनाला आव्हान देण्यासाठी राजधानी पणजीसमोरील मांडवी नदीपलीकडे बेती पोलीस चौकीवरच हल्ला करण्याची मोहीम आखली. २६ ऑक्टोबर १९५५ च्या रात्री बेती पोलीस चौकीवर त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी हल्ला केला व एका पोलीस शिपायाला गोळ्या घालून ठार केले, तर काहीजणांना जायबंदी केले. या चकमकीत मोहन रानडेंनाही गोळी लागून ते गंभीररीत्या जखमी झाले. परंतु न डगमगता त्याही परिस्थितीत आपल्या सहकार्‍यांना आपणास तिथेच टाकून देऊन शत्रूच्या हाती न लागता पळून जाण्याचा आदेश दिला. मोहन रानडेंना जखमी अवस्थेत पकडण्यात आले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार करण्यात आले व त्यांच्यावर पोलीस चौकीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व रवानगी २६ वर्षांसाठी लिस्बनच्या काळकोठडीत करण्यात आली.

नामवंत संगीतकार सुधीर फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ऍड. प्रीती कामत यांच्या अथक प्रयत्नांमुळे जानेवारी १९६९ मध्ये त्यांची लिस्बन कारागृहातून सुटका झाली व ७ फेब्रुवारी १९६९ रोजी ते गोव्यात परतले.

१९ डिसेंबर १९६१ ला गोव्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु साडेचारशे वर्षांच्या जुलमी पोर्तुगीज राजवटीत राज्यकर्त्यांनी गोमंतकीय जनतेला प्रादेशिक शिक्षणापासून वंचित ठेवले होते. शिक्षण नसल्याने त्यांना सरकारी नोकर्‍या मिळत नसत. बरेच गोमंतकीय त्यामुळे मुंबईला कामाधंद्यानिमित्त जात असत. मोहन रानडेंनी शिक्षणाच्या संधी गोमंतकीयांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘गोमंतक मराठी शिक्षण परिषदे’च्या माध्यमातून कुंभारजुवे, नेवरे व वारखंड येथे शाळा सुरू केल्या. त्यांची सुविद्य पत्नी स्व. विमलताई रानडे यांनी स्वतः कुंभारजुवे येथील शाळेची जबाबदारी स्वीकारली.
नेवरे येथे श्री. नंदा धर्मा बोरकर शाळेचे काम पाहू लागले. दयानंद आर्य स्कूल असे या शाळेचे नामकरण करण्यात आले व ही शाळा कालपरत्वे आता हायस्कूल बनलेली आहे. रानडे दांपत्याची सामाजिक कार्याला वाहून घेण्याची तळमळ पाहून गोव्याचे तत्कालीन राज्यपाल डॉ. गोपालसिंग यांनी त्यांना चिंबल येथे सरकारी भूखंड लीजवर दिला. तिथे रानडे यांनी महिला व बालकल्याणगृहाची १९८४ साली उभारणी केली कामगारवर्गातील मुलांना शिक्षण तसेच ग्रामीण महिलांना अर्थार्जनाच्या सोयीसुविधा निर्माण केल्या. आजही इंदिरानगर – चिंबल येथील त्या घरात ‘सरस्वती शिशुवाटिका’ तर्फे मुलांना शिक्षण देण्यात येते.

मोहन रानडे हे एक जाज्वल्य देशप्रेमी होते. पोर्तुगिजांच्या दास्यातून गोमंतभूमीच्या मुक्तीसाठी त्यांनी केलेले कार्य महान होते. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्यदेवीच्या होमखंडात त्यांनी उडी घेतली. कारावास भोगला. त्यांच्या धीरोदात्ततेचे, संयमाचे, साहसाचे आणि निधड्या वृत्तीचे तौलनिकदृष्ट्या विचार केल्यास स्वातंत्र्यवीर सावरकरांशीच साम्य दिसेल. गोवेकरांवर रानडे यांचे फार मोठे ऋण आहे. त्यांच्या ऋणातून गोमंतकीय कधीही उतराई होऊ शकणार नाहीत. त्यांच्या त्यागाची येणार्‍या पिढीला जाणीव होण्यासाठी गोव्यात त्यांचे एखादे स्मारक झाल्यास तीच आम्हा गोमंतकीयांची स्व. मोहन रानडे यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेची पावती ठरेल! सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे याकामी निश्‍चितच पुढाकार घेतील अशी आशा आहे.