‘स्व’पासून ‘सृष्टी’पर्यंत…

0
195

– विद्या प्रभुदेसाई

 

ईश्वरनिर्मित अशा आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडे-वेली, सागर-डोंगर, गुरे-वासरे, फुले-फळे-पाखरे या सार्‍या घटकांकडे पाहण्याची निकोप दृष्टी या कविता देऊन तर जातातच, पण त्याचबरोबर बालवयातच खूप शिकण्याची, काम करण्याची आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याची कामना व्यक्त करून पुनः ती ईश्वराने पूर्ण करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणारे संस्कार मनावर घडविण्याचे कामही या कविता नकळतपणे करून जातात.

औपचारिक शिक्षणाची आजची अवस्था कोणत्याही संवेदनशील मनाला गोंधळात टाकणारी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. शिक्षण हे माणसाला अनुभव संपन्न, ज्ञानसंपन्न, संस्कारसंपन्न बनविण्याची एक प्रक्रिया आहे. वास्तविक कोणताही जीव अस्तित्वात आल्यापासूनच अनेक प्रकारे शिक्षण घेत असतो. स्वसंरक्षण आणि स्वसंवर्धन या दोन सहजप्रेरणांशी त्याच्या शिक्षणाची प्रक्रिया संलग्न असते. परंतु ईश्वराने दिलेल्या भाषिक सामर्थ्याच्या आधारे माणूस मात्र शिक्षणातून संस्कारित अशा सामाजिक आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या वाटेने पुढे पुढे सरकल्याचे दिसते. ‘स्व’पासून ‘सृष्टी’पर्यंत पोहोचविणे हा शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन औपचारिक शिक्षण घेतलेल्या मागच्या कित्येक पिढ्यांनी पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण केल्याची वस्तुस्थिती कोणीही नाकारू नये. परंतु आज मात्र आपल्या पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करणारा सुशिक्षित- सुसंस्कारित नागरिक तयार करणे हे औपचारिक शिक्षणाचे असलेले मूलतत्त्व समाज पूर्णपणे विसरला आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही बौद्धिकतेबरोबरच
भावनिकतेला आवाहन करणारी असावी. माणूस म्हणजे रोबोट नव्हे. अस्ति, जायते, वर्धते आणि मृयते या सजीवाच्या सर्व अवस्था पार करताना त्याच्या शारिरीक अवस्थांतरांप्रमाणेच त्याच्यात बौद्धिक, मानसिक आणि भावनिक अवस्थांतर होणे नितांत गरजेचे असते. आजच्या औपचारिक शिक्षणामध्ये वरील अवस्थांतराला पूरक अशा अभ्यासक्रमाची योजना जरी केली असली, तरी त्या योजनांची अंमलबजावणी करताना व्यावहारिक दृष्टी ठेऊन ज्या अनेक गफलती आणि घोळ घातले जातात त्याचे फलित म्हणजे आजच्या सामाजिक समस्या असेच कधीकधी वाटू लागते. शिक्षणक्षेत्रच या सामाजिक प्रश्नांवरील तोडगा शोधू शकेल असा रास्त विश्वास वाटल्यानेच सुमारे गेली पंचवीस वर्षे अभ्यासक्रमात नागरिक हक्क (र्कीारप ीळसहींी), पर्यावरण शिक्षण (एर्पींळीेपाशपींरश्र र्डींीवळशी), मूल्यशिक्षण (तरर्श्रीश एर्वीलरींळेप) या आणि यांसारख्या कितीतरी विषयांचा ‘परीक्षेसाठी’ तर राष्ट्रीय सेवा योजना (छडड), क्रिडा (डिेीींी) अशा अनेक क्षेत्रांचा विद्यार्थ्यांना गुणांची आशा दाखवून समावेश केलेला दिसतो. औपचारिक शिक्षणात केलेल्या वरील सर्व सुधारणा पाहिल्या तर आज आपल्यासमोर सुशिक्षिततेबरोबरच निकोप, सक्षम, सुसंस्कारी, मूल्यनिष्ठ युवा पिढी असायला हवी होती. प्रत्यक्ष चित्र मात्र समाधानकारक नाही असेच वेगवेगळ्या पातळ्यांवर ऐकू येते.
या पार्श्वभूमीवर विचार केल्यास मागील हजारों वर्षातील पिढ्यांनी विश्वात भरून राहिलेला ज्ञानाचा साठा आपल्या पुढील पिढीला वेगवेगळ्या माध्यमातून दिलेला दिसतो. प्रत्येक नव्या पिढीनेही पहिल्या पिढीकडून ज्ञान घेऊन त्याला आपल्या वर्तमानाशी जोडून आपले जीवन संपन्न बनवून पुन्हा पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेवल्याचे दिसते. यासाठी त्यांना औपचारिक शिक्षणाची फार गरज वाटली होती असेही दिसत नाही. अनुभवाला आलेल्या निसर्ग आणि त्यातील कित्येक रहस्यांनी त्याला विचार करायला प्रवृत्त केले. निसर्गाच्या गूढ अनाकलनीय कळांनी त्याला भारावून सोडले. आपल्याला जाणवलेल्या निसर्गशक्तीला त्याने वेद-सूक्तातून आळवले. असा हा गूढ अनाकलनीय, कल्पनातीत निसर्गच आपल्याला जगण्याची ऊर्जा, ऊर्मी, शक्ती देतो याची खात्री झाली आणि अशा निसर्गरूपालाच देव मानून तो त्याला नतमस्तक झाला. ज्याच्या श्वासाने पान हालते आणि स्पर्शाने फूल फुलते अशा रवि-चंद्राच्या निर्मात्याला शरण गेला. आपल्या आंतरिक अनुभूतीला आकार देण्यासाठी मूर्ती घडविली, आपल्याप्रमाणेच त्या मूर्तीला उन-पाऊस-वारा यांपासून संरक्षित ठेवण्यासाठी देऊळ बांधले. भक्ति भावनेला वाट करून देणारी पूजा-आरती केली. हे सर्व करण्यामागील त्या शक्तीने दिलेल्या प्रेरणेला मात्र तो विसरला नाही. मानवी जीवनातील श्रद्धा-भक्ती ही मूल्ये इथेच निर्माण झाली असावीत.
औपचारिक शिक्षणात समाविष्ट केलेल्या साहित्याच्या अभ्यासाने अशी अनेक जीवनमूल्ये हळुवारपणे विद्यार्थ्यांच्या गळी उतरविली. ही मूल्ये केवळ परिक्षेत मार्क मिळविण्यासाठी शिकली-शिकवली जात नसत, उलट ही मूल्ये जीवनात आवश्यक वाटल्याने ती कितपत समजली आहेत याचा पडताळा घेण्यासाठी परीक्षा घेऊन त्या शिक्षणावर शिक्कामोर्तब केले जाई. बालभारतीसारख्या जुन्या पाठ्यपुस्तकातून शिकलेल्या अशा अनेक कविता पुढे आपले संपूर्ण आयुष्य संस्कारसंपन्न तर बनवितच असत पण बरोबरच ही संस्कारांची शिदोरी दुसर्‍या पिढीच्या मनात अगदी संत ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दांत सांगायचे तर ‘‘ये हृदयीचे ते हृदयी घालावे…’’ अशा अलगदपणे सोडली जात असे.
बालभारतीच्या पहिल्या पुस्तकात असे भक्ती-श्रद्धामूल्य घेऊन येणार्‍या, बहुधा आज ४०-५० वरील वयोगटातील लोकांनी अभ्यासल्या असाव्यात अशा कविता म्हणजे, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश…’ किंवा ‘अजाण आम्ही तुझी लेकरे…’ या कविता उदाहरणासाठी पाहता येतील.

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणी गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील ?

अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा
चंद्र सूर्य ही तुझीच रूपे तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर डोंगर फुले फळे पाखरे

अनेक नावे देवा तुझी रे, दहा दिशांना घर
करिसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर
खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी

या आणि अशा कवितांनी पर्यावरणीय संस्कारांबरोबरच बालमनावर कोरलेले श्रद्धा-भक्तीचे संस्कार हे चिरंतन शाश्वत असेच संस्कार होते. ब्रह्मांडाचे इतके सार्थ आणि समर्पक वर्णन केलेल्या अशा कविता वर्गात लयबद्ध चालीतून पाठ करून घेतल्या जात. अनेकवेळा शिकताना जरी त्यातील मूल्यांची सार्थकता लक्षात आली नाही तरी वाढत्या वयाबरोबरच त्या कविता मनावर पक्के संस्कार करीत. ईश्वरनिर्मित अशा आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडे-वेली, सागर-डोंगर, गुरे-वासरे, फुले-फळे-पाखरे या सार्‍या घटकांकडे पाहण्याची निकोप दृष्टी या कविता देऊन तर जातातच, पण त्याचबरोबर बालवयातच खूप शिकण्याची, काम करण्याची आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याची कामना व्यक्त करून पुनः ती ईश्वराने पूर्ण करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणारे संस्कार मनावर घडविण्याचे कामही या कविता नकळतपणे करून जातात. अनेक नावांनी ओळखल्या जाणार्‍या देवाचे घरही दाही दिशांना व्यापून आहे असे सांगतानाच ‘इतुके सुंदर जग
तुझे जर, तू किती सुंदर असशील?’ असाही प्रश्न बालमनात या कविता उभ्या करीत. या सुंदर जगातील सुंदर जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बालपणीच अशा कवितांमधून मुलांच्या मनावर ठसविला जात असे. असे संस्कार देणार्‍या या कविता मनात कोरलेल्या किती तरी यशस्वी पिढ्या आपल्या अवतीभवती आजही वावरताना दिसतात.