स्मिथचे अपयश विराटच्या पथ्यावर

0
237

>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर

>> जायबंदी जसप्रीत बुमराहची घसरण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याच्या अपयशाचा फायदा कोहलीला झाला आहे. जायबंदी असलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह याची मात्र सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

९२८ गुण खात्यात असलेला कोहली दुसर्‍या स्थानावरील स्मिथपेक्षा १७ गुणांनी पुढे आहे. न्यूझीलंडिवरुद्ध नुकत्याच संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथला केवळ ४३ व १६ धावांचे योगदान देता आले होते. ऑस्ट्रेलियाने हा सामना २९६ धावांनी जिंकला होता. चेतेश्‍वर पुजारा (७९१) व अजिंक्य रहाणे (७५९) यांनी आपले चौथे व सहावे स्थान राखण्यात यश मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने आपल्या कामगिरीच्या चढत्या आलेखासह क्रमवारीतही मुसंडी मारली आहे. पर्थ कसोटीत १४३ व ५० धावा कुटलेल्या लाबुशेनने पाचव्या स्थानावर हक्क सांगितला आहे. सलग तीन डावांत १५० किंवा जास्त धावा करण्याचा पाकिस्तानच्या झहीर अब्बास व मुदस्सर नझर यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी धोडक्यात हुकलेल्या लाबुशेन याने तीन स्थानांची प्रगती केली आहे.

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याने प्रथमच ‘टॉप १०’मध्ये प्रवेश करताना १३व्या स्थानावरून नववे स्थान मिळविले आहे. श्रीलंकेविरुद्ध अनिर्णीत अवस्थेत संपलेल्या कसोटीत त्याने नाबाद १०२ धावांची खेळी साकारली होती. टी-ट्वेंटी क्रमवारीत बाबर प्रथम व वनडेत द्वितीय स्थानावर आहे. वनडे क्रिकेट पदार्पणात शतक झळकावल्यानंतर आपल्या कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा शतकाने करत अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष खेळाडू बनलेल्या आबिद अली याने ७८व्या स्थानासह क्रमवारीत प्रवेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात बळी घेतलेल्या नील वॅगनर याने ८३४ गुणांसह पुन्हा तिसरा क्रमांक मिळविला आहे. सामन्यात ९ बळी घेतलेला टीम साऊथी याने ‘टॉप १०’मध्ये पुन्हा स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने न्यूझीलंडविरुद्ध (९७-९) पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करत कककिर्दीतील सर्वोत्तम ८०६ गुणांसह वैयक्तिक सर्वोच्च पाचवे स्थान प्राप्त केले आहे.
अष्टपैलूंमध्ये विंडीजचा जेसन होल्डर पहिल्या व भारताचा रवींद्र जडेजा दुसर्‍या स्थानावर आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ ३६० गुण घेत पहिल्या स्थानी आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया (२१६), श्रीलंका (८०), न्यूझीलंड (६०), इंग्लंड (५६) यांचा क्रमांक लागतो.